सुक्‍या मच्छी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ 

fisherman
fisherman

सावंतवाडी - कोट्यवधी रुपये खर्च करून सोयींनीयुक्त मच्छी मार्केट उभारल्यानंतरसुद्धा येथे व्यवसाय करणाऱ्या सुक्‍या मच्छी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे. नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र त्या ठिकाणी व्यवसाय होणार नसल्याने आपल्याला पहिल्याच मजल्यावर सामावून घ्यावे; अन्यथा आम्ही आहोत त्याच ठिकाणी बसणार, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आता यावर सुवर्णमध्य काढावा लागणार आहे. 

पालिकेच्या वतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून आलिशान मच्छी मार्केट उभारण्यात आले. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते घाईगडबडीत मार्केटचे उद्‌घाटन करण्यात आले; मात्र त्यावेळी गाळ्याचे वाटप करताना कोणाला विश्‍वासात घेण्यात आले नाही, असे सुके मासे विक्रेत्यांचे म्हणणे होते. आम्हालासुद्धा पहिल्याच मजल्यावर जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती; मात्र पालिका प्रशासनाने ताठर भूमिका घेतल्याने त्यांनी उद्‌घाटनाच्या वेळी केसरकर यांना काळे झेंडे दाखवित आपला विरोध नोंदविला होता. या प्रश्‍नाबाबत पालिकेकडे उपोषण करण्याचा इशारा दिला होता; मात्र आचारसंहिता असल्यामुळे हा प्रश्‍न अधांतरित राहीला. पालिका निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बाहेर झोपड्या उभारून बसलेल्या मच्छी विक्रेत्यांना पालिकेचे कर्मचारी त्रास देत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आज आपली कैफियत वृत्तपत्राकडे मांडली. या वेळी मच्छीमार म्हणाले, ""आम्ही स्थानिक आहोत. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केटमध्ये आम्हाला प्राधान्य देणे गरजेचे होते. खालच्या मजल्यावर आम्हाला जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु त्या ठिकाणी जागा न देता वरच्या मजल्यावर बसण्याची सक्ती पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. त्या ठिकाणी सद्य:स्थिती लक्षात घेता लिफ्टची सोय नाही. त्यामुळे ग्राहक वरच्या मजल्यावर चढून येणार नाहीत. त्यामुळे आमच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. आम्ही स्थानिक असल्यामुळे खालच्या मजल्यावर आम्हाला पालिकेने जागा द्यावी तसेच मासे सुकलेले असल्यामुळे आम्हाला पाणी, विजेची गरज लागत नाही. त्यामुळे आकारण्यात आलेली 120 रुपये रक्कम कमी करावी, अन्यथा आम्ही या जागा सोडणार नाही. स्थानिकांना खालची जागा देऊन बाहेरून येणाऱ्या मोठ्या विक्रेत्यांना वरच्या मजल्यावर जागा द्यावी.'' 

..अन्यथा कारवाई करू 
याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सुक्‍या मच्छी विक्रेत्यांना वरच्या मजल्यावर जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आणि रस्त्यावर बसणाऱ्या अन्य छोट्या मच्छी विक्रेत्यांनी बसावे, असा पालिकेचा दंडक आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे काही दिवसांनी हा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वरच्या मजल्याचा पर्याय स्वीकारावा, अन्यथा नाईलाजाने कारवाई करावी लागेल.'' 

काय आहे सद्य:स्थिती? 
मच्छी मार्केटच्या खालच्या मजल्यावर काही सुक्‍या मच्छीमारांना बसवता येऊ शकते. त्या व्यापाऱ्यांची संख्या दहाच्या आत आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता ताजे मासे विकणाऱ्या काही व्यावसायिकांनी दोन ते तीन गाळे अडवून ठेवले आहेत. त्याबाबत योग्य ते नियोजन झाल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो; मात्र त्यासाठी पालिका प्रशासनाची सकारात्मक मानसिकता आवश्‍यक असल्याचे त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com