आचारसंहितेमुळे रखडली रस्त्याची दुरुस्ती

सुनील पाटकर
रविवार, 6 मे 2018

आचारसंहितेच्या कचाट्यात हे काम अडकल्याने आता रस्त्याची दुरुस्ती 6 महिने रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना हाडे मोडत प्रवास करावा लागणार आहे.

महाड - प्रवाशांना आणि वाहनचालकांना रडकूंडीला आणणाऱ्या म्हाप्रळ पंढरपूर मार्गच्या काही भागाच्या दुरुस्तीसाठी दिड कोटी रुपयांचा निधी जरी उपलब्ध झाला असला तरीही आचारसंहितेच्या कचाट्यात हे काम अडकल्याने आता रस्त्याची दुरुस्ती 6 महिने रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना हाडे मोडत प्रवास करावा लागणार आहे.

म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गाव असलेल्या आंबवडे ते रायगड असा राष्ट्रीय महामार्गही होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून येणारा हा रस्ता भोर घाटातून पंढरपूर यांना जोडणारा महत्वाचा राज्य मार्ग आहे. अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हाप्रळ पंढरपुर मार्गाची खाडापट्यात पू्र्ण दुरावस्था झालेली आहे. वराठी ते गोठे पर्यंत प्रवास करणे म्हणजे अग्निदिव्य झालेले आहे. महाड तालुका हद्दीतील 47 कि. मी. लांबीच्या या रस्त्याची खाजगी टेलिफोन कंपन्यांनी खोदाई करुन वाटोळे केले आहे. सध्या पार गेलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु केवळ ओवळे ते रावढळ या 5 कि. मी. भागातच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असतानाच विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता जाहिर झाल्याने या कामाची वर्कऑर्डर काढणे शक्य होणार नाही. 29 मे पर्यंत ही आचारसंहिता लागु आहे. 15 मे नंतर डांबरीकरण होत नसल्याने डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर करावे लागणार आहे. मात्र या प्रकरणी विविध संस्था संघटना तसेच राजकीय पक्ष या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करत आहेत. शिरगाव सरपंच सचिन ओझर्डे यांनीही याबाबत निवेदन देऊन दुरुस्ती न झाल्यास सरपंच संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिला आहे.

म्हाप्रळ पंढरपूर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांने निधी मिळाला आहे. परंतु आचारसंहिता लागू झाल्याने काम कसे करायचे हो मोठा प्रश्न आहे. - संजय पाटिल (उपअभियंता, सा. बां. विभाग, महाड)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Due to the Code of Conduct the repair of the road has been stoped