सावंतवाडीत वाढत्या चोऱ्यांमुळे भीती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सावंतवाडी - शहरात पुन्हा चोरीचे प्रकार वाढत असून गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात घरफोड्या व भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. पोलिस प्रशासनाने वेळीच कोणतीही मोठी उपाययोजना न केल्यास या चोरांचा उपद्रव वाढण्याची शक्‍यता आहे. यासाठी पोलिस प्रशासन कोणत्या ठोस कार्यवाहीद्वारे चोरांवर आळा घालते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सावंतवाडी - शहरात पुन्हा चोरीचे प्रकार वाढत असून गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात घरफोड्या व भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. पोलिस प्रशासनाने वेळीच कोणतीही मोठी उपाययोजना न केल्यास या चोरांचा उपद्रव वाढण्याची शक्‍यता आहे. यासाठी पोलिस प्रशासन कोणत्या ठोस कार्यवाहीद्वारे चोरांवर आळा घालते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

माजगाव परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी काही उपाययोजना सांगितल्या होत्या. याला दोन दिवस होत नाही तोच काल (ता. 20) महिलेचे दागिने लुटण्याचा प्रकार घडला. यावरून पोलिस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा धाक चोरट्यांना राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यातच बसस्थानक परिसरातही अशाच प्रकारचे चोरीचे प्रकार घडले असून काल (ता. 20) अशाच प्रकारची घटना घडली. पोलिस प्रशासन फक्त हातावर हात धरून बघ्याचीच भूमिका घेणार काय, असा सवालही सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. चोरीचा गुन्हा घडल्यास निदान एक महिन्याच्या आत त्याचा छडा लावणे अपेक्षित असते; परंतु पोलिस प्रशासनाच्या फिर्यादी नोंद म्हणून ठेवलेली घटनेचा तपास सकारात्मक दिशा पकडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. शहरात चोरीच्या घटनेने सामान्य विद्यार्थीवर्गही बळी पडत आहेत. वृद्ध महिला व व्यक्तींना फसवणुकीने गंडा घालून चोरी केली जात आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांवरून पोलिसांचा धाक आहे तो कोणाला? असा प्रश्‍न पोलिस प्रशासनासमोर उभा आहे.

पोलिस प्रशासनावर परिणाम काय?
आठवड्याभरात जवळपास पाच ते सहा चोरीच्या घटना शहर व परिसरात घडल्या आहेत. यात गर्दीच्या ठिकाणी बसस्थानकातील एका घटनेचा समावेश आहे. घटनेच्या संख्येची आकडेवारी पाहता सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या घटनांचा पोलिस प्रशासनावर परिणाम होतो का आणि झाला तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

गृह राज्यमंत्री लक्ष देणार काय?
येथील शहराचे रहिवासी असलेले दीपक केसरकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे विद्यमान गृह राज्यमंत्रीपदी कार्यरत आहेत. केसरकरांच्या सावंतवाडीत अशा प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार वारंवार घडणे हे शहराच्या सुरक्षेला एक प्रकारचे दाग लावल्याप्रमाणे आहे. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबरोबरच याकडे केसरकरांनीही लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

Web Title: Due to fears of rising thefts