esakal | आर्थिक तंगीमुळे ७० टक्के मच्छीमार घरीच बसणार... कोकणात कुठे आहे हे विदारक चित्र... वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

fishing

गतवर्षी मासेमारी हंगामात एका पाठोपाठ आलेली वादळे, कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाउन यामुळे संपूर्ण मत्स्य व्यवसाय कोलमडला.

आर्थिक तंगीमुळे ७० टक्के मच्छीमार घरीच बसणार... कोकणात कुठे आहे हे विदारक चित्र... वाचा

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका यंदाच्या मच्छीमारी हंगामच्या पहिल्या दिवसांपासून मच्छीमारांना बसणार आहे. एक ऑगस्टला मासेमारी सुरू करण्यात अनिश्‍चितता आहे. परराज्यातून येणाऱ्या खलाशांची उपलब्धतता, व्यावसायासाठी आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्याने कर्जाचे थकलेले हप्ते या परिस्थितीत व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता मच्छीमारांमध्ये नाही. तरीही स्थानिक खलाशांच्या साह्याने वातावरणाचा अंदाज घेत 30 टक्‍केच मच्छीमार समुद्रात जाऊ शकणार आहेत. 

गतवर्षी मासेमारी हंगामात एका पाठोपाठ आलेली वादळे, कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाउन यामुळे संपूर्ण मत्स्य व्यवसाय कोलमडला. मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरवर्षी नारळीपौर्णिमेनंतरचा मासेमारी हंगाम मच्छीमारांना दोन पैसे मिळवून देतो; परंतु यंदा मासेमारीवर कोरोनाचेच सावट आहे. ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी सुरू होईल. जिल्ह्यात कर्नाटक, नेपाळ, केरळ येथून खलाशी आणले जातात. लॉकडाउनमुळे त्यांना आणण्यात अनंत अडचणी आहेत. मोजक्‍याच मच्छीमारांनी खलाशी आणून त्यांना क्‍वारंटाईन केले होते. त्यामुळे 1 ऑगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी 30 टक्‍केच नौका सज्ज आहेत. वातावरण स्थिरावले तर त्यांना समुद्रात जाण्यास संधी मिळू शकते. उर्वरित मासेमारी नारळीपौर्णिमेनंतरच सुरू होईल. केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर होण्यासाठी नाबार्डच्या सूचनेनुसार कर्ज घेतलेल्या मच्छीमारांना एक लाख 60 हजार रुपये खेळत भांडवले उपलब्ध करून देण्याचे आदेश होते; परंतु त्यांच्या अंमलबजावणीत अडथळे आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह सहाय्यक मत्स्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी मच्छीमारांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज भासत आहे. 

डिझेल वाढीने खर्चात भर 
मच्छीमार नैसर्गिक संकटात सापडला असतानाच डिझेल दर वाढीने कंबरडेच मोडणार आहे. ट्रालरबोटीचा विचार केल्यास एका फिशिंग ट्रीपसाठी (10 ते 15 दिवस) बोटीला 2000 ते 2500 लिटर डिझेल लागते. कोरोना लॉकडाउनपासून ते आजपर्यंत चार महिन्यांत साधारण 18 ते 20 रुपये डिझेल भाववाढ झाली आहे. प्रत्येक ट्रिपसाठी मच्छीमारांना 35 ते 50 हजार रुपये जादा मोजावे लागणार आहेत. याचा आर्थिक मेळ बसवताना कसरत करावी लागेल. 

कोरोनाचे सावट यंदाच्या मच्छीमार हंगामावर आहे. त्यातुन मार्ग काढून काहींनी 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार 30 टक्‍केच मच्छीमार जाऊ शकतात. 
- आप्पा वांदरकर, मच्छीमार 

परराज्यातील खलाशी अजुनही आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिकांवर मदार राहील. अजुनही पावसाळी वातावरण असल्याने समुद्र खवळलेला आहे. बंदरावरही तशी लगबग नाही. मच्छीमार समुद्रात जायच्या मनस्थितीत नाही. नारळीपौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थाने मासेमारी सुरू होईल. 
- एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्‍त 

संपादन ः विजय वेदपाठक

loading image
go to top