पाली : कचऱ्यामुळे मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात

अमित गवळे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने कचराकुंड्यांमधील कचरा वेळीच उचलला तर तो साठून राहणार नाही. त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी देखील कचऱ्याचे विभाजन करून तो कचरा कुंडीत टाकावा किंवा घंटा गाडीकडे सुपूर्द करावा. 

पाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे शहराच्या व गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक आपली गुरे (जनावरे) चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. चरण्यासाठी गवत शिल्लक नसल्याने मग ही गुरे कोणाच्या परसात किंवा शेतात घुसतात व नुकसान करतात. तर बऱ्याचदा ही गुरे गाव व शहराच्या उकिरड्यावर व कचरा कुंड्यांजवळ टाकलेले अन्न पदार्थ व पुठ्ठा असे पदार्थ नाइलाजाने खातात. टाकून दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी बहुतांश गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लस्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालण्याने त्यांची उर्जा कमी होते अशक्तपणा येतो.

कचराकुंड्यांमध्ये व उकिरड्यावरील कचऱ्यात धातू तसेच अनुकूचिदार वस्तू उदा. घरगुती वापराची सुई, इंजेक्शनच्या सुया यांसह विविध घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्नलिकेला इजा पोचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतातही. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखील मृत्यू होतो आणि हे दुष्टचक्र सुरुच राहते.

कचऱ्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्नपदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. कुंडित कचरा टाकताना तो प्लास्टिकच्या पिशवीत टाकू नये. ओला व सुका कचरा वेगळा करुनच कचारा कुंडीत टाकावा. विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करावे. पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी जनावरांना खाण्यासाठी मोकाट न सोडता त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगीकारणे गरजेचे आहे.

- डॉ. बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड-अलिबाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to Garbage Animals Health is in Problem