वादळसदृश परिस्थितीमुळे ऐन हंगामात बांगड्यास 'ब्रेक'

प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

ऐन मासेमारी हंगामात सध्या बांगडा मासळी मिळत असताना वादळसदृश परिस्थितीमुळे बांगड्यास ब्रेक मिळाला आहे. परिणामी किनारपट्टीवरील लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे.

मालवण - हवामान खात्याने वर्तविलेल्या इशार्‍यानुसार चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीस आजच्या तिसर्‍या दिवशीही कायम आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनार्‍यावर होत आहे. ऐन मासेमारी हंगामात सध्या बांगडा मासळी मिळत असताना वादळसदृश परिस्थितीमुळे बांगड्यास ब्रेक मिळाला आहे. परिणामी किनारपट्टीवरील लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे.

भारतीय हवामान खात्याने समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्री लाटांच्या उंचीत वाढ होणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे स्पष्ट केले होते.

गेले दोन दिवस विजेच्या लखलखाटासह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळला. कालच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली तरी खोल समुद्रातील चक्रीवादळ तसेच अमावास्येचे उधाण यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. सोसाट्याच्या वार्‍यासह समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागास काल सकाळी बसला.

समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लाटांचा मारा किनार्‍यावर होत होता. यात किनार्‍यावर उभ्या करून ठेवलेल्या मच्छीमारांच्या छोट्या होड्यांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 

समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने काल सकाळी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका काही वेळातच किनार्‍यावर माघारी परतल्या. यात माघारी परतताना काही छोट्या होड्यांना समुद्री लाटांचा तडाखाही बसला. मात्र सुर्दैवाने मोठी घटना घडली नाही. काल काही मच्छीमारांना किरकोळ मासळीच मिळाल्याने या मासळीच्या लिलावासाठी किनार्‍यावर गर्दी झाली होती. मात्र अन्य मोठ्या नौका वादळसदृश परिस्थितीमुळे सुरक्षित बंदरात आणण्यात आल्या होत्या. ऐन मासेमारी हंगामात वादळसदृश परिस्थितीचा फटका जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मच्छीमारांना बसल्याचे दिसून आले.

गेले काही दिवस जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बांगडा मासळीची मोठी कॅच मच्छीमारांना मिळत होती. या मासळीला मोठी मागणी असल्याने त्याला चांगला दरही मिळत होता. मात्र गेले दोन दिवस समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने या बांगड्याला ब्रेक मिळाला आहे. परिणामी किनारपट्टीवरील मासळीची होणारी लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे. ऐन मासेमारी हंगामात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे लाखो रुपयांचे नुकसान मच्छीमारांचे झाले आहे. समुद्रात निर्माण झालेली वादळसदृश परिस्थिती निवळण्यास आणखी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागेल असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

Web Title: Due to stormy conditions break to Fish Season