वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळमधील 50 कुटुंबे अंधारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सावंतवाडी - वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगरवाडी येथील सुमारे 50 कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत. निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे.

सावंतवाडी - वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगरवाडी येथील सुमारे 50 कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत. निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे.

किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तात्काळ काम सुरू करा, अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन कोणत्याहीक्षणी वनविभागासमोर आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार राजन तेली व भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिला आहे.

चौकुळ धनगरवाडी भागात गेली अनेक वर्षे पोचली नाही. त्या ठिकाणचे लोक वीज नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शासनाच्या योजनेतून या ठिकाणी वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला होता; मात्र त्यात येणाऱ्या जमिनीत काम कसे काय करायचे असा प्रश्‍न वनविभाग करीत असून वीज प्रशासनाला काम करू दिले जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

यापूर्वी तब्बल दोन वेळा या प्रश्‍नावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. याबाबत जाब विचारण्यासाठी आज माजी आमदार तेली यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एकमेकांवर जबाबदारी न करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या तेली व सारंग यांनी लोकांचा अंत पाहू नका, त्यांना सेवा द्या, अन्यथा तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल, असा इशारा दिला. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आपण हे काम करतो, असे चव्हाण यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांचे रौद्र रूप पाहून चव्हाण यांनी तात्काळ त्या ठिकाणी जा सर्वे करण्याच्या सूचना सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना दिल्या त्यानुसार तत्काळ अहवाल द्या, असे त्यांनी सांगितले.

...तर कारनामे उघड करू
श्री. तेली म्हणाले, ""लोकांच्या हितासाठी वन अधिकारी कायद्याचा बाऊ करून योजना रखडून ठेवत असतील तर ते योग्य नाही. तब्बल 50 घरे आजही अंधारात आहेत ही गोष्ट जिल्ह्याच्या विकासाला भूषणावह नाही. तांत्रिक बाब दूर करून योग्य ती भूमिका वनविभाग व वीज मंडळाने घ्यावी अन्यथा दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे कारनामे उघड केल्या शिवाय पर्याय नाही.''

Web Title: Due to the unauthorized forest department, 50 families in Chakul are in dark