पाली खोपोली मार्गावर डंपर पलटला

अमित गवळे
गुरुवार, 10 मे 2018

पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात रस्ता भरावासह होत असलेले खोदकाम करतांना कोणतीही सुरक्षितता घेतली जात नाही. त्यामुळे वारंवार या मार्गावर अपघात घडत आहेत. 

पाली (रायगड) - पाली-खोपोली मार्गावर चिवेगाव फाट्याजवळ गुरुवारी (ता.१०) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कोळसा वाहून नेणारा डंपर रस्त्याच्या कडेला पलटला. वाहनचालकाने प्रसंगावधानता दाखवून डंपरबाहेर उडी मारली त्यामुळे वाहनचालकाचा जीव बचावला. मात्र तो जखमी झाला. 

पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात रस्ता भरावासह होत असलेले खोदकाम करतांना कोणतीही सुरक्षितता घेतली जात नाही. त्यामुळे वारंवार या मार्गावर अपघात घडत आहेत. 

डंपर चालक पप्पू यादव हा सानेगाव वरुन कोळसा घेवून पाली खोपोली मार्गावर खोपोलीकडे जात होता. चिवेगावाच्या फाट्यानजीक मातीच्या कमकुवत भरावामुळे डंपर रस्त्याच्या कडेला पलटला. 

रस्त्याचे काम सुरु असताना धोकादायकरित्या रस्ता खोदून ठेवला आहे. रस्त्यावर दगड, माती, खडी पसरली आहे. त्यामुळे अपघाती घटनांत वाढ झाली असल्याचे वाहनचालक यादव याने सांगितले.

 या कामाची जबाबदारी असणार्‍या ठेकेदारांनी मात्र काम करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घेतलेली नाही. रस्ता रुंदीकरणाच्या कामात रस्त्याच्या भरावापासून, खोदकाम, यामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. तसेच या कामामुळे रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Web Title: dumper accident on pali khopoli highway