सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयास शेकडो डंपरचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील रखडलेली शासकीय वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ करावी, या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपरचालक-मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यायासमोर शेकडोंच्या संख्येने डंपर उभे करून उपोषण सुरू केले. हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील रखडलेली शासकीय वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ करावी, या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपरचालक-मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यायासमोर शेकडोंच्या संख्येने डंपर उभे करून उपोषण सुरू केले. हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात ३१ मे रोजी बंद झालेला वाळू उत्खननाचा ठेका सहा महिने बंद आहे. पावसाळा संपूनही अद्याप वाळू पट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे गौणखनिज व्यवसायावर अवलंबून असणारी जिल्ह्यातील हजारो कुटुंबे अडचणीत आहेत. शासन व प्रशासनाकडून मात्र वाळू लिलाव प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे डंपरचालक-मालकांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो डंपर उभे करून बेमुदत आंदोलन छेडले.

शासन व प्रशासनाविरोधात जोरजोरात घोषणा देत सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात कुडाळ तालुका डंपरचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट, पदाधिकारी अभिषेक गावडे, समीर दळवी, चित्तरंजन सावंत, आनंद शिरवलकर, धीरज परब, ऋषिकेश वजराटकर, चेतन पडते आदींसह शेकडो डंपरचालक-मालक सहभागी झाले होते. आम्ही निवडून दिले. तुम्ही काय केले, होते ते आमचे बंद केले, अशी घोषणा देत सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रनिनिधींची खिल्ली उडविली.

पोलिस प्रशासनाचा सावध पवित्रा
सिंधुदुर्गनगरी येथे दोन वर्षांपूर्वी झालेले जिल्हास्तरीय डंपर आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी लाठीचार्ज करत अटकसत्र राबविले होते. शासकीय मालमत्तेची तोडफोडही झाली होती. त्यावेळचे झालेले तीव्र डंपर आंदोलन लक्षात घेता यावेळी पोलिस प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलन चिघळणार नाही, याबाबत सावध पवित्रा ठेवला होता.

अन्यथा आंदोलन सुरूच
जिल्ह्यातील शासकीय वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने वाळू व्यावसायिकांसह, डंपरचालक-मालक कामगार आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तरी जिल्हा प्रशासनाने तत्काळ जिल्ह्यातील सर्व वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन सुरूच राहील. प्रसंगी याहून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा संघटनेतर्फे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट यांनी दिला.
 

Web Title: Dumper owners agitation in Sindhudurg