तुळशी गावातील शेतकरी वळतोय दुबार शेतीकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मंडणगड - तालुक्‍यातील तुळशी येथील शेतजमीन भातकापणींनतर सहा महिने ओस असते. यावर्षीपासून येथील शेतकरी आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळला असून कडधान्य, भाजीपाला लागवड करायला सुरवात केली आहे. गावातील अनेक शेतकरी दुबार शेतीकडे वळल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. 

मंडणगड - तालुक्‍यातील तुळशी येथील शेतजमीन भातकापणींनतर सहा महिने ओस असते. यावर्षीपासून येथील शेतकरी आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळला असून कडधान्य, भाजीपाला लागवड करायला सुरवात केली आहे. गावातील अनेक शेतकरी दुबार शेतीकडे वळल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. 

समीर पारधी व शशिकांत रक्ते यांनी पावसाळ्यात सगुणा तंत्रज्ञानाने भातशेती केली होती. त्याचा त्यांना दुपटीने फायदा झाला. हेक्‍टरी 40 क्विंटल होणारे उत्पन्न 100 क्विंटल झाले. येथे दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात भात कापणी आणि झोडणी केली जाते. त्यानंतर ज्या भागातील शेतात बारमाही पाणी आहे किंवा जमिनीत ओलावा आहे अशा ठिकाणचे शेतकरी शेतात कडधान्यची लागवड करतात. दरवर्षीच्या उत्पन्नातून बाजूला ठेवलेल्या पावट्याचा बियाणे म्हणून उपयोग केला जातो. गावाच्या माथ्यावरच तुळशी धरण आहे. त्यामुळे गावाच्या सखल भागात पाण्याचे प्रमाण वाढले आहे. धरण झाल्यानंतर सुरवातीला एकदा दुबार शेती करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर कालव्यातून होणारा अपुरा पाणीपुरवठा, मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली नाही; मात्र पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्याने रामचंद्र पारधी व समीर पारधी यांनी हंगामी शेती करण्यास सुरवात केली आहे. दोन एकर क्षेत्रात कलिंगड, चवळी, माठ, कोथिंबीर, मेथी, भेंडी, टोमॅटो, कोबी, कनक, मुळा याची लागवड त्यांनी केली आहे. त्यांना आता कोंब फुटून ते दिसू लागले आहेत. 

""सगुणा पद्धतीने भात शेती केल्याने दुपटीने उत्पन्न झाले. पावसाळ्यातील भातपिकानंतर खरीप आणि रब्बी पीक घेता येणार आहे. त्यातून होणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा होणार असून गाव सुजलाम सुफलाम होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या दृष्टीने विचार करून पुन्हा दुबार शेतीकडे वळावे.'' 
रामचंद्र पारधी, शेतकरी, तुळशी 

सत्तरीतही करतात शेती 

ज्याच्या शेतात शेणखत, गावात पत आणि घरात एकमत असते, तो खरा शेतकरी, अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. तुळशी गावचे शशिकांत रक्ते हे सकाळी नवीन वाहनचालकांना गाडी चालविण्याचे ट्रेनिंग देतात. दुपारनंतर पत्नी वनिता रक्ते यांच्यासह सत्तरीतही शेतीची कास धरत शेती करीत आहेत. 

Web Title: duplicate farming