नाराजी हेरली, अन्‌ आघाडी मारली...

खेड - सुनील दरेकरांना उपनगराध्यक्ष करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले सतीश चिकणे यांना उचलून घेताना नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि नगरसेवक व कार्यकर्ते. (छायाचित्र - रोहन राठोड, खेड)
खेड - सुनील दरेकरांना उपनगराध्यक्ष करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले सतीश चिकणे यांना उचलून घेताना नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि नगरसेवक व कार्यकर्ते. (छायाचित्र - रोहन राठोड, खेड)

खेड पालिका - दरेकरांच्या नाराजीचा घेतला चिकणेंनी फायदा; गाफील शिवसेना डावपेचातही मागे
खेड - एखाद्या चित्रपटात दाखवला जाणारा अपहरणाचा प्रसंग पाहून अंगावर शहारे येतात. थरार अनुभवायला मिळतो. तसाच राजकीय थरार आणि राजकारणातील हायजॅक करण्याचा प्रकार काल (ता. २८) खेड उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुभवायला मिळाला. सुनील दरेकर यांच्याबाबतीत झाला. दरेकरांची नाराजी आघाडीने हायजॅक केली आणि शिवसेनेला घाम फुटला.

माजी नगरसेवक सतीश चिकणे यांनी सुनील दरेकर नाराज असल्याचे नेमके हेरले व त्यांना उपनगराध्यक्षपदी बसवण्याची ग्वाही देऊन आघाडीच्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. आघाडीसाठी ते हिरो ठरले. शिवसेनेत असलेल्या अंतर्गत वादाचा थेट फायदा चिकणे यांनी घेतला. निवडणूक झाल्यापासून ज्येष्ठतेविषयी दरेकर यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला होता.

अडीच वर्षे हे पद मिळावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती; मात्र वरिष्ठांनी त्यांना दाद न दिल्याने दरेकरांनी वेगळा निर्णय घेतला. चिकणे यांनी शब्द दिला, तो खरा ठरला आणि शिवसेनेच्या गटात उदासीनता पसरली. चिकणे आणि दरेकर गेली पाच वर्षे एकत्र काम करीत होते.

राजकारणापलीकडे त्यांची मैत्री. त्यामुळे दरेकरांची नाराजी चिकणेंच्या लक्षात आली. काल सकाळी त्यांनी उपनगराध्यक्षपदाच्या अर्जावर दरेकरांची सही मिळवली आणि त्यांना भूमिगत केले. दरेकर दीर्घकाळ सापडले नाहीत, त्यामुळे शिवसेनेची तारांबळ उडाली. दरेकरांना शोधण्याचा प्रयत्न दोन वाजेपर्यंत अयशस्वी झाला. दोन वाजता ते थेट सभागृहातच आले. तेव्हा अर्ज मागे घेण्याची वेळ संपली होती. त्यानंतर झालेल्या घडामोडींनी खेडमधील राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुखांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन नगरसेवकांचे म्हणणे समजावून घ्यायला हवे होते; पण तसे झाले नाही. शिवसेनेतर्फे बाळा खेडेकर यांचे नाव निश्‍चित झाले होते, तर त्यांनाचा मतदान करावे असा पक्षादेश (व्हीप) का काढण्यात आला नाही. याचा फायदा सत्ताधारी आघाडीने घेतला. राजकीय खेळीत आघाडी आणि चिकणे हुशार ठरले. कट्टर शिवसैनिक म्हणून दरेकरांची ओळख होती. त्यामुळे ते नाराज असले तरी असे काही पाऊल उचलणार नाहीत, असे वाटून सेना गाफील राहिली. तेच पक्षाला भोवले.

शिवसेना व्हीप काढणार
विषय समितीच्या निवडीवेळी शिवसेना व्हीप बजावण्याची दाट शक्‍यता आहे. दरेकर यांनी मी शिवसेनेचाच उपनगराध्यक्ष असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना व्हीप पाळावा लागेल. व्हीप पाळला नाही, तर शिस्तभंगाच्या कारवाईला तोंड द्यावे लागेल. यातून दरेकर कसा मार्ग काढतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरेकरांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते - बाळा खेडेकर

दाभोळ / खेड - उपनगराध्यक्षपद मिळवलेले दरेकर अडचणीत येऊ शकतात. त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असा दावा गटनेते बाळा खेडेकर यांनी केला. दरेकरांच्या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गटनेते बाळा खेडेकर म्हणाले की, त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, विषय समिती निवडणुकीत नगराध्यक्षांचे मत घेता येत नाही. त्यामुळे विषय समित्या शिवसेनेकडेच राहतील. दरेकर फक्त मी शिवसेनेतच आहे, असे सांगत आहेत. प्रत्यक्षात तसे नाही. आम्ही त्यांना शिवसैनिक मानत नाही. २००६ च्या परिपत्रकाप्रमाणे एखादा नगरसेवक ज्या पक्षातून निवडून आला असेल, त्याला मतदानाची वेळ येईल त्यावेळी त्याने पक्ष सदस्यालाच मतदान करायचे असते. त्यासाठी स्वतंत्रपणे पक्षादेश काढण्याची गरज नाही. यानुसार दरेकरांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते; पण हा निर्णय पक्षप्रमुख आणि वरिष्ठ घेतील.

दरम्यान, खेडमधील घडामोडींवर दळवी यांनी बोचरे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दुसऱ्यांच्या घराकडे वाईट नजर टाकणाऱ्यांनी प्रथम आपले घर अबाधित आहे का हे तपासून घ्यावे. खेड पालिकेत उपनगराध्यक्ष निवडीत शिवसेनेच्याच नगरसेवकाने पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढविली. त्याला खेड शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला व बहुमत असतानाही उपनगराध्यक्षपद सेनेने गमावले. याबाबत  बोलताना सूर्यकांत दळवी म्हणाले की, गेली २५ वर्षे दापोलीमध्ये एकसंध असलेली शिवसेना ही पक्षातीलच काही स्वार्थी लोकांमुळे विखुरली गेली आहे. दापोलीच्या राजकारणात वाढलेली ढवळाढवळ मी विधानसभेत अपयशी होण्यामागचे मुख्य कारण आहे. अशा स्वार्थी माणसांनी दुसऱ्याचे घर फोडण्यांपेक्षा आपल्या घराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, हे बरे.

...तर शिवसेना सत्तेबाहेर असती
दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीनंतर श्रेय घेण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड चालली आहे. मी जर का लक्ष घातले नसते, तर दापोलीत आज शिवसेनेला सत्तेबाहेर बसावे लागले असते असा दावा दळवी यांनी केला व या बाबींचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे सोपविणार असल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com