इको फ्रेंडली बाप्पा सिंधुदुर्गातून मुंबईला

नेत्रा पावसकर
Monday, 27 July 2020

गणेश मूर्ती बनविण्याची पारंपरिक कला जोपासणारे अनेक कलाकार अजूनही सिंधुदुर्गातील गावागावात दिसून येतात. त्यासोबत भजनी मंडळेही भजनांचा सराव करत असल्याचे सूर एकू येतात. 

तळेरे (सिंधुदुर्ग) - अलीकडील काही वर्षात शहराप्रमाणे ग्रामीण भागातही प्लास्टर ऑफ पॅरीसच्या आकर्षक आणि मोठ्या गणेश मूर्तींना वाढती मागणी आहे; मात्र तोंडवली (ता. कणकवली) येथील तुषार मेस्त्री हा युवा मूर्ती कलाकार याला अपवाद ठरला असून तो शाडूची मातीच्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करून आपल्या कलेतून "निसर्ग वाचवा', असा संदेश देत आहे. यावर्षी त्याने 550 इको फ्रेंडली गणेश मूर्ती मुंबईला पाठविल्या आहेत. 

आता तो कोकणातील घरोघरी लागणाऱ्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कामात व्यस्त आहे. कोरोनामुळे जनता हैराण झाली असल्याने यंदा गणेश मूर्तीची किंमत वाढवणार नसल्याचे त्याने यावेळी सांगितले. शेतीची कामे संपून श्रावणमास सुरू होताच कोकणातील गावागावात गणेश शाळांमध्ये काम सुरू होते आणि नागपंचमीपासून या गणेश शाळांकडे बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी सर्वांचेच आपसूकच पाय वळतात. अवघ्या महिन्यावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाल्याचे चित्र गावागावातील गणेश शाळांमध्ये दिसून येत आहे. गणेश मूर्ती बनविण्याची पारंपरिक कला जोपासणारे अनेक कलाकार अजूनही सिंधुदुर्गातील गावागावात दिसून येतात. त्यासोबत भजनी मंडळेही भजनांचा सराव करत असल्याचे सूर एकू येतात. 

दरम्यान, विशेष म्हणजे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने तुषारकडे शाडू मातीचे आणि इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाहायला मिळतात. यावर्षी मुंबई येथे एका कारखान्यात 550 इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाठविल्या. या मूर्ती राज्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी तसेच मॉलमध्ये विक्रीस ठेवल्या जातात. गेली तीन वर्षे या गणेश मूर्ती विक्रीसाठी मुंबईला पाठवित आहेत. त्यासाठी 7 कामगार सतत कार्यरत असतात.

इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि शाडूच्या मातीची गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाबाबत सांगताना तुषार म्हणाला, ""शाडूच्या मातीचे गणपती साच्यातून फक्त पाच मिनिटात काढू शकतो, म्हणजे दिवसभरात खूप गणपती होऊ शकतात; मात्र इको फ्रेंडली गणपती साच्यातून काढायला किमान सहा तास लागतात. म्हणजेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती दिवसभरात एकच होऊ शकते. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी मेहनतही जास्त करावी लागते. मुंबईला पाठविण्यासाठी सुमारे आठ महिने या इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे काम सुरू असते. यावर्षी कोरोनामुळे गणेश मूर्तींची मागणी वाढली; मात्र आकार कमी झाला. 

पर्यावरण पूरक मूर्ती 
यावर्षी 6 इंचापासून 3 फुटपर्यंत गणेश मूर्ती बनविल्या आहेत. पेपरच्या कागदाची रद्दी किमान चार दिवस पाण्यात भिजत ठेऊन ती नंतर मिक्‍सरला लावून बारीक मिश्रण करून घ्यायचे. त्यात व्हायटिंग पावडर, शाडू माती व गोंद टाकून मिश्रण तयार करायचे. अशा मिश्रणापासून इको फ्रेंडली गणपती केले जातात. विशेष म्हणजे या प्रकारच्या गणेश मूर्ती कितीही मोठ्या असल्या तरीही अत्यंत हलक्‍या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या असतात. म्हणजेच त्या पर्यावरण पूरक असतात. 

काकांकडे ही कला शिकलो आणि पाच वर्षांपूर्वी तोंडवली येथे गणेश शाळा सुरू केली. पहिल्या वर्षी 40 मूर्ती तयार केल्या होत्या आणि आता त्या 200 पर्यंत पोहोचल्या आहेत. तोंडवली, बावशी, नांदगाव, असलदे, हडपीड अशा विविध ठिकाणांहून ऑर्डर मिळतात. शिवाय ऑर्डरप्रमाणे राज्यभरही मूर्ती पोहचवल्या जातात. 
- तुषार मेस्त्री, युवा मूर्तीकार, तोंडवली 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eco friendly ganesh murti kokan sindhudurg