सह्याद्रीची खदखद शिगेला

सह्याद्रीची खदखद शिगेला

सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यावरणसमृद्ध भाग म्हणजे कोकण; पण ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पर्यावरण संवर्धन बाजूला पडले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात थोडे फार पर्यावरण टिकून आहे; पण जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील हिरवाई कायम असली तरी त्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. यातून नवा संघर्ष उभा राहिला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात बिबट्याच्या मानवी वस्तीतील संचार, उपद्रवाच्या, शेतीत वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्याच्या घटना वारंवार घडतात. गेल्याच आठवड्यात परमे (ता. दोडामार्ग) येथे बिबट्याने गावात घुसून तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. त्याच दिवशी आंबोली या पर्यावरणाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेल्या गावात डुक्‍कराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब पेरणाऱ्याला वन्यजीवप्रेमी डॉ. राजीव सिन्हा यांनी पकडून दिले. या सगळ्या संघर्षाचे मुळ गेल्या काही वर्षातील जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाशी आणि निष्क्रीय ठरलेल्या वनविभागाच्या कारभाराशी जोडलेले आहे. मुळात या दोन्ही जिल्ह्यात खासगी वनांचे क्षेत्र जास्त आहे.

लाकूड परवाने वितरीत करण्या पलिकडे फारसे काही न करणाऱ्या वनविभागाची नजर या क्षेत्राकडे पोचतच नाही. येथे साधारण १५ वर्षापूर्वी केरळमधील रबर व्यावसायिक शेतकऱ्यांची वक्रदृष्टी पडली. त्यांनी अत्यल्प मोबदल्यात सह्याद्रीच्या रांगामधील डोंगरच्या डोंगर खरेदी केले. मोठ-मोठे बुलडोजर, जेसीबी लागून येथील झाडे मुळासकट उचकटली आणि तेथे रबर, अननस याची लागवड केली. त्या पाठोपाठ उरल्या-सुरल्या जंगलात स्थानिकांनी तोड करत बांबू, काजू लागवडीचा सपाटा लावला. यामुळे शेतीचे क्षेत्र जंगलाच्या दिशेने सरकू लागले. जंगलात वृक्षांच्या जागी झाडे लागली; पण यातील विविधता हरवली. तृणभक्षक प्राण्यांना जंगलात खाद्य मिळनासे झाले. रबराच्या बागांमुळे सौर कुंफणाचा अडसर होवू लागला. जंगलातील अधिवास कमी झाल्याने गव्यांचे कळपच्या कळप, हरणे, सांबरे, दोडामार्गकडील भागात हत्ती, माकडे, डुक्‍कर वस्तीलगत शेती बागायतीत घुसु लागले.

याला आणखी एक किनार आहे. सिंधुदुर्गाच्या शेजारी कर्नाटकमधील दाट जंगलाचा भाग आहे. तेथे महाराष्ट्राच्या तुलनेत सुयोग्य जंगल व्यवस्थापन आहे. यामुळे तेथे वन्यप्राण्यांची संख्या वाढली; पण जंगल क्षेत्र तितकेच राहिले. तेथील वन्यप्राणीही सिंधुदुर्गासह कर्नाटक सीमेलगतच्या गोवा, कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात स्थलांतरीत झाल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. शिवाय दोडामार्ग, वैभववाडी या कर्नाटक आणि रत्नागिरी-कोल्हापूरच्या सीमेवरील तालुक्‍यात नवे मोठे धरण प्रकल्प पूर्णत्वास आले. यामुळे जलस्त्रोत अधिक मजबूत झाले. याचा दुहेरी परिणाम झाला. पाणीमुळे ऊस शेती वाढल्याने जंगलतोड झाली. शिवाय जलस्त्रोत वाढल्याने त्या क्षेत्रात वन्य प्राणी स्थलांतराचे प्रमाणही वाढले. या सगळ्यातून एकीकडे जंगलातील विविधता कमी झाली तर दुसरीकडे वन्यप्राण्याची संख्याही वाढली. यातून अन्नसाखळी अडचणीत आली आहे.

यातून वन्यप्राणी-कोकणी माणसाचा संघर्ष तीव्र झाला आहे. याचा सर्वाधिक फटका मोठ्या संख्येने असलेल्या छोट्या (अल्प भूधारक) शेतकऱ्यांना बसला आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्यांना शेती-बागायती करणे कठीण झाले आहे. यातून खरीप हंगामातील भात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. पारंपरिक शेती क्षेत्रही कमी झाले आहे. याचा परिणाम पारंपरिक रोजगार क्षेत्रावर झाला आहे.

वनविभागाला मात्र याचे फारसे सोयरसुतक नाही. कोकणात अन्नसाखळीतील वरच्या स्तरात समावेश असलेल्या पट्‌टेरी वाघाचे वास्तव्य आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासाठी जागृती करण्याची गरज आहे; मात्र वनविभागाच्या नाकाखालून रबरसाठी बेसुमार वृक्षतोड झाली आहे. काही पर्यावरण प्रेमींनी सिंधुदुर्गाचा वनविभाग २०१३ पासून ‘टायगर ॲटॅक’चे रेकॉर्ड लपवण्याचा प्रयत्न करत असून, वाघाचे अस्तित्व पुसून काढण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. या भागात पर्यावरण कमजोर करून खनिजासाठी हे क्षेत्र खुले करण्याचा हा अर्थपूर्ण प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला होता; पण यावरही वनविभागाने कोणतेही उत्तर दिले नव्हते. एकूणच कोकणचा निसर्ग, येथील पर्यावरण प्रचंड अस्वस्थ आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये राहणारा कोकणी माणूस यात भरडला जात आहे.

वन्यप्राण्यांच्या अधिवासावर परिणाम
सिंधुदुर्गाच्या वनविभागाचे मानद वन्यजीव संरक्षक प्रा. नागेश दप्तरदार म्हणाले,  ‘‘पूर्वी कोकणातील रहिवाशांच्या गरजा मर्यादित होत्या. त्या काळात स्थानिक येथील जंगल राखण्याचाही प्राधान्याने विचार करायचे. सिंधुदुर्गाचा विचार करता येथे ८० टक्‍के खासगी जंगल आहे. लोक सहभागामुळेच ते टिकून होते; पण अलिकडे वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी ‘कॅश क्रॉप पॅटर्न’ स्वीकारला आहे. यामुळे काजू, रबर, अननस याच्या बागा वाढत आहेत. नव्या धरण प्रकल्पामुळे ऊस शेतीही वाढली आहे. याचा थेट परिणाम वन्यप्राण्यांच्या अधिवासावर होत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com