शिक्षण खात्याचा "हॉरर शो' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कर्जत  - विद्यार्थी विकासाच्या मूल्यमापनासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे अंमलबजावणीतील गांभीर्याअभावी हसे होत आहे. "एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमांतर्गत शाळांना भेटी देण्यासाठी चक्क मृत अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्याने रायगड जिल्ह्यात याला "हॉरर शो'चे स्वरूप आले आहे! 

कर्जत  - विद्यार्थी विकासाच्या मूल्यमापनासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे अंमलबजावणीतील गांभीर्याअभावी हसे होत आहे. "एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमांतर्गत शाळांना भेटी देण्यासाठी चक्क मृत अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्याने रायगड जिल्ह्यात याला "हॉरर शो'चे स्वरूप आले आहे! 

महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे जिल्हापातळीवर राबवला जातो. यासाठी वर्ग-1 आणि 2 चे अधिकारी नेमून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. तेथे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून, परीक्षण करून त्याचा अभिप्राय देतात. या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेही दिले जातात. 

गुरुवारी (ता. 15) रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांत हा उपक्रम राबवण्यात आला. त्यासाठी दिलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत मृत आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांचीही नावे समाविष्ट करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. 
कर्जतमध्ये शाळा-भेटीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांची यादी तपासली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. उदाहरण द्यायचे झाले, तर कर्जतचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शाळिग्राम पाटील यांची काही महिन्यांपूर्वी नाशिकला बदली झाली होती. तेथे जलतरण तलावात पोहताना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचेही नाव या यादीत आहे. त्यांची नेमणूक कर्जत तालुक्‍यातील बेडीस गावाच्या शाळेवर करण्यात आली आहे! त्यांचा यादी क्रमांक 285 आहे. याशिवाय साप चावून मृत्यू पावलेले केंद्रप्रमुख पांडुरंग मेंगाळ यांची तिघर धनगरवाडी या शाळेवर नेमणूक केली आहे. त्यांचा यादी क्रमांक 268 आहे. ते कर्जतचे रहिवासी होते. जिल्ह्यात अशी आणखी उदाहरणे सापडतील, असा दावा जाणकारांनी केला. कर्जत तालुक्‍याची यादी पाहता, ज्या अधिकाऱ्यांची तालुक्‍याबाहेर बदली झाली आहे, त्यांचीही नावे या यादीत आहेत. 

अधिकारी अंधारात 
शाळा भेटीसाठी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्यांच्यापैकी अनेकांना आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. 7) सायंकाळी साडेचारच्या सुमारास याबाबतची पत्रे मिळाली. काहींना अजूनही तशी पत्रेही मिळाली नाहीत, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही यादी बुधवारीच प्रसिद्ध केल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या उपक्रमाचा मूळ हेतू साध्य होताना दिसत नाही. 

Web Title: Education Department horror show