शेकाप, शिवसेना प्रभावी रायगड जिल्ह्यात 

प्रणय पाटील - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

१५ पैकी नऊ तालुक्‍यांत एकही सदस्य निवडून न आल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे... 

अलिबाग - रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होणार आहे. या निवडणुकीत मतदारांनी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची दांडी गुल केली आहे. जिल्ह्यात शेकाप व शिवसेना उभारी घेत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. भाजप केवळ पनवेल व उरणपुरता मर्यादित राहिला आहे. यामुळे शेकाप व शिवसेनेतच खरे राजकारण रंगणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालावर लक्ष टाकल्यास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे किंगमेकर ठरल्याचे दिसून येते. गावा-गावात असलेल्या कार्यकर्त्यांची फळी; तसेच प्रचाराचे योग्य नियोजन या जोरावर शेकाप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शेकापने ५९ पैकी २३ जागांवर विजय मिळवला. मागील निवडणुकीत शेकापचे १९ सदस्य होते. पनवेल, पेण, अलिबाग या बालेकिल्ल्यांत आपणच किंग असल्याचे दाखवत शेकापने कर्जत, सुधागड, मुरूड, रोहा, माणगाव, पोलादपूर या तालुक्‍यांमध्येही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकत ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबत आमदार धैर्यशील पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार बाळाराम पाटील यांचा राजकीय प्रभाव वाढल्याचे दिसून येते.

रायगड जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला उतरती कळा लागल्याचे निकालांमधून दिसून येते. मागील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीछेहाट होत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मागील निवडणुकीत २० जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला केवळ १२ जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सुनील तटकरेंच्या रोहा तालुक्‍यातही शिवसेनेने एक जागा जिंकत राष्ट्रवादीला धोक्‍याचा इशारा दिला आहे. या तालुक्‍यातील चारपैकी एका जागेवर शेकापने; तर दोन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. कर्जत व खालापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी आपली ताकद अबाधित असल्याचे दाखवून दिले. म्हसळा व तळा या तालुक्‍यातील मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास टाकल्याने राष्ट्रवादीला दुहेरी आकडा गाठता आला. जिल्ह्यातील १५ पैकी नऊ तालुक्‍यांमध्ये राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आलेला नाही.

शिवसेना पसरतेय हातपाय
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गावा-गावात हातपाय पसरत असल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत १४ जागा जिंकत शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार जागा वाढल्या. १८ जागांवर विजय मिळवत तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. महाड, माणगाव तालुक्‍यांमध्ये शिवसेनेचा आवाज घुमला. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या अलिबाग तालुक्‍यात शिवसेनेने दोन; तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या रोहा तालुक्‍यात एक जागा जिंकत सर्वांनाच धक्का दिला. कर्जत, खालापूर, सुधागड, उरण, मुरूड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्‍यांमध्येही शिवसेनेने ताकद दाखवून दिली. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले व महेंद्र दळवी यांनी प्रभाव दाखवून दिला. आमदार मनोहर भोईर यांना उरण तालुक्‍यात काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. उरणमध्ये केवळ एका जागेवर शिवसेनेला विजय मिळाला.

भाजपची ताकद पनवेल-उरणपुरती 
भाजपची जिल्ह्यातील ताकद पनवेल व उरण तालुक्‍यांपुरती मर्यादित असल्याचे जिल्हा परिषद निकालांवरून स्पष्ट झाले. पनवेल व उरण वगळता भाजपचा उर्वरित १३ तालुक्‍यांमध्ये एकही सदस्य निवडून आलेला नाही. पनवेलचे आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या तालुक्‍यात दोन जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. उरणमधील आपली एक जागा राखण्यात पक्षाला यश मिळाले. मागील निवडणुकीत पक्षाचा केवळ एक सदस्य निवडून आला होता. 

काँग्रेस नेत्यांची वाट बिकट
रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप, माजी मंत्री रवींद्र पाटील, माजी आमदार मधुकर ठाकूर या नेत्यांची वाट बिकट असल्याचे निकालांवरून दिसून आले. विधानसभेला या नेत्यांना मतदारांनी नाकारल्यानंतर जिल्हा परिषदेतही हेच घडले आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र पाटील यांना आपला पुत्र वैकुंठ पाटील व माजी आमदार मधुकर ठाकूर यांना आपला पुत्र राजेंद्र ठाकूर यांना निवडून आणण्यात अपयश आले. माणिक जगताप यांना महाड, रवींद्र पाटील यांना पेण व मधुकर ठाकूर यांना अलिबाग या आपल्या तालुक्‍यांमधून एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही. काँग्रेसचे उरणमध्ये दोन; तर कर्जतमध्ये एक असे केवळ तीन सदस्य निवडून आले. यामुळे काँग्रेस नेते शाम म्हात्रे, महेंद्र घरत यांनी ताकद दाखवून दिली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला सात जागांवर विजय मिळाला होता.

तालुका      जागा      शेकाप      राष्ट्रवादी  शिवसेना  काँग्रेस      भाजप
 पनवेल     ८      ६      ०      ०      ०      २
 कर्जत     ६      २      २      १      १      ०
 खालापूर     ४      ०      ३      १      ०      ०
 सुधागड     २      १      ०      १      ०      ०
 पेण     ५      ५      ०      ०      ०      ०
 उरण     ४      ०      ०      १      २      १
 अलिबाग     ७      ५      ०      २      ०      ०
 मुरूड     २      १      ०      १      ०      ०
 रोहा     ४      १      २      १      ०      ०
 तळा     २      ०      २      ०      ०      ०
 माणगाव     ४      १      ०      ३      ०      ०
 म्हसळा     २      ०      २      ०      ०      ०
 श्रीवर्धन     २      ०      १      १      ०      ०
 महाड     ५      ०      ०      ५      ०      ०
 पोलादपूर     २      १      ०      १      ०      ०
एकूण     ५९      २३      १२      १८      ३      ३

Web Title: effective Sena Raigad district