रत्नागिरीत रात्रीत आठ घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

सलग दुसऱ्या दिवशी खेडशीमध्ये चोऱ्या झाल्या. चोरीच सत्र कायम सुरूच आहे. मलुष्टे आणि बी. सी. ओसवाल यांचे दुकान फोडणारे चोरटेदेखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी काही संशयितांनाही ताब्यात घेतल्याचे समजते.

रत्नागिरी : शहर आणि परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल (ता. 2) एका रात्रीमध्ये शिवाजीनगर, छत्रपतीनगर, आठवडा बाजार, खेडशी आदी भागांमध्ये आठ घरफोड्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. चार ते आठ दिवसांच्या टप्प्यावर चोऱ्या होत आहेत. चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शहर पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच शहरामध्ये एकाच रात्रीत आठ घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांची झोप उडवली होती.

ते चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते; मात्र त्यांचा माग काढण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. दरम्यान, चार दिवसांपूर्वी शहरामध्ये पुन्हा चोरट्यांनी दोन दुकाने फोडून ऐवज लांबविला. सलग दुसऱ्या दिवशी खेडशीमध्ये चोऱ्या झाल्या. चोरीच सत्र कायम सुरूच आहे. मलुष्टे आणि बी. सी. ओसवाल यांचे दुकान फोडणारे चोरटेदेखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी काही संशयितांनाही ताब्यात घेतल्याचे समजते. या चोऱ्या उघड करण्यामध्ये गर्क असलेल्या पोलिसांना चोरट्यांच्या आणखी एका टोळक्‍याने दणका दिला.
बंद फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून चोऱ्या झाल्या आहेत. शिवाजीनगर येथे दोन फ्लॅट, सनी आंबेकर, गौरव सावंत यांचे बंद घर फोडले. साळवी स्टॉप येथील इरत्ना मामीलवार यांचे घरही चोरट्यांनी फोडले. तेथून चांदीच्या भांड्यासह 65 हजारांचा ऐवज लंपास केला. खेडशीमध्येही काशिनाथ कदम यांचे घर फोडून 15 हजारांचा ऐवज लांबविला. शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदविली आहे.

चांदीचा हार आणि छत्री वाचली
गौरव सावंत यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर बंद कपाट फोडून आतील लॉकर तोडले; परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. सुदैवाने याच कपाटात खुल्या कप्प्यामध्ये चांदीचा हार आणि छत्री होती. ती मात्र चोरट्यांच्या निदर्शनास पडली नाही, असे सावंत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: eight robberies in ratnagiri