सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 16 गावांत बिगुल वाजणार  

Election Of 16 Villages Of Sawantwadi Assembly Constituency
Election Of 16 Villages Of Sawantwadi Assembly Constituency

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे लांबलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील अत्यंत महत्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. या मतदार संघात एकुण 16 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या ग्रामंपचायतीकडे लक्ष वळवले आहे. 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी 11, दोडामार्ग 3, वेंगुर्ले 2 अशा एकूण 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 
सावंतवाडी तालुक्‍यात एकुण 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यापैकी निम्म्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता होती.

वेंगुर्ले तालुक्‍यातील आरवली ग्रामपंचायत शिवसेनेकडे होती तर सागरतीर्थ ग्रामपंचायत गावविकास आघाडीकडे होती. आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेत असलेले शिवसेना राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षांची महाविकास आघाडी व भाजप असे होण्याची शक्‍यता आहे; मात्र स्थानिक पातळीवर काय निर्णय होतात यावर त्या-त्या गावातील भवितव्य अवलंबून असते. 

विधानसभा मतदार संघातील 16 ही ग्रामपंचायतींचा कालावधी ऑगस्टमध्ये संपला होता. त्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतींचा निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या; मात्र आता हळूहळू सर्व सुरू करण्यात येत असल्याने राज्य निवडणूक विभागाने लॉकडाऊन काळात रखडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुक प्रश्‍नी येथील तहसीलर कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका निवडणुक अधिकारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाली. मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक दिवाळीनंतर जाहीर होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी आठ महिन्यानंतर आता मतदारसंघात दाखल होत ज्या गावांच्या निवडणुका होत आहेत, त्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

आंबोली, कोलगाव, इन्सुली, आरोंदा, मळगाव, चौकुळ या गावांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मळेवाड, मळगाव, आरोसमध्ये भाजप विशेष लक्ष देऊन शिवसेनेच्या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळविले होते. त्यामुळे आता या 11 ग्रामपंचायतींसाठी शिवसेना - भाजपमध्ये चुरस होणार आहे. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची राज्यात आघाडी आहे; मात्र आघाडीचा धर्म पाळणार की या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती 
सावंतवाडी तालुका - अकरा ग्रामपंचायती - इन्सुली, आरोस, मळगाव, आरोंदा, तळवडे, मळेवाड, आंबोली, चौकुळ, दांडेली, कोलगाव, डिंगणे 
दोडामार्ग तालुका - तीन ग्रामपंचायती - तेरवण मेढे, कुडासे व आयनोडे 
वेंगुर्ले तालुका - दोन ग्रामपंचायती - आरवली व सागरतीर्थ 

"" सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबरोबर जिल्ह्यातील 71 मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही; मात्र त्या आधी राज्यात बसलेली महाविकासआघाडी लक्षात घेता, त्या तालुक्‍यातील तालुकाप्रमुख यांच्याकडून संबंधित गावात जाऊन चाचपणी करणार आहेत. गरज असेल तर त्याठिकाणी महाविकास आघाडी करू, अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. '' 
- संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

"" विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या शिवसेना बांदा ग्रामपंचायत, आंब्रड जिल्हा परिषद सदस्य निवडणुक व सावंतवाडी पालिका या तिन्ही निवडणुकीत भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच होणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयश्री खेचून आणणार आहे. महाविकास आघाडीचा काहीही फरक पडणार नाही. या ग्रामपंचायतीबरोबर दोडामार्ग नगरपंचायत व वैभववाडी नगरपंचायतीतही कमळ फुलवणार असून सर्वांना सोबत घेऊन सामोरे जाणार. '' 
- राजन तेली, जिल्हाध्यक्ष भाजप 

"" मतदारसंघांमध्ये असलेल्या 16 ग्रामपंचायतींबरोबर जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पूर्ण ताकदीने उतरणार आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून कार्यकर्त्यांना जे अभिप्रेत आहे, त्याप्रमाणे रणनिती आखण्यात येणार आहे. लवकरच मी जिल्ह्यातील गाव दौरा करणार आहे.'' 
- बाळा ऊर्फ चंद्रकांत गावडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

"" सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या 16 महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्या-त्या गावातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन पक्ष म्हणून आम्ही तयारी करणार आहोत; मात्र ज्याठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत; परंतु कुठल्याही प्रकारे भाजपला फायदा होणार नाही याची दक्षता घेणार आहोत. '' 
- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com