स्टार प्रचारकांविना स्थानिकच प्रमुख भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

"स्थानिक पातळीवर प्रचाराची धुरा सांभाळण्यास शिवसेनेकडे उत्तम नेते आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते आवश्‍यक तिकडे प्रचारात गुंतले तरी आम्हाला चिंता नाही. शिवसेनेकडे प्रचाराचा अनुभव असलेले दुसऱ्या फळीचेही सक्षम नेते आहेत.'' 
- आमदार उदय सामंत

रत्नागिरी - कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धूम सुरू आहे. प्रचार आणि मेळावे, वैयक्तिक भेटीगाठींवर उमेदवार व नेत्यांचा भर आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस-कुणबी सेना आघाडी आणि बहुजन समाज पार्टी देखील रिंगणात आहेत. प्रतिष्ठेच्या मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आदी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचे मोठे नेते अडकल्याने स्थानिक आमदार व इतर नेत्यांनाच "स्टार प्रचारक' होऊन खिंड लढवावी लागणार आहे. 

निवडणुकीसाठी पक्षाचा प्रभाव पडण्यासाठी अनेक पक्षांकडून स्टार प्रचारकांना बोलावण्यात येते, मात्र या वेळी सर्वच मोठ्या पक्षांनी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आदी महापालिकेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक त्या निवडणुकीत व्यग्र आहेत. प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देत निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील आमदार, जिल्हाप्रमुख, तालुखाप्रमुखांवर निवडणूक प्रचाराची जबाबदारी पडणार आहे. त्यामुळे हेच स्टार प्रचारक होणे आवश्‍यक आहे. 

शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र सेनेतच अंतर्गत खदखद सुरू आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये सूर्यकांत दळवी-रामदास कदम यांच्यात वाद टोकाला गेला आहे. उमेदवारी याद्या बदलण्यापासून ते "मातोश्री'वर गेल्यानंतर अपेक्षित मानसन्मान न मिळाल्यानंतर शांत बसण्याचा निर्णय घेण्यापर्यंत त्याचे पर्यवसान झाले आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम भाजपमध्ये गेले. या ठळक घडामोडीसह अंतर्गत अनेक वाद सुरू आहेत. दापोलीत सर्वच पक्ष स्वबळावर लढणार आहे. दक्षिण रत्नागिरीत नाराजीमुळे अनेकांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. त्यांना थोपविण्यात सेनेला अपयश आले आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार, हे निश्‍चित आहे. जिल्हा परिषद गटासाठी 264 उमेदवारी अर्ज, तर नऊ पंचायत समित्यांसाठी 422 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे बहुरंगी लढतीने रंगणारा हा फड रंगवण्यासाठी स्टार प्रचारक शोधावे लागणार आहेत. 

"स्थानिक पातळीवर प्रचाराची धुरा सांभाळण्यास शिवसेनेकडे उत्तम नेते आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते आवश्‍यक तिकडे प्रचारात गुंतले तरी आम्हाला चिंता नाही. शिवसेनेकडे प्रचाराचा अनुभव असलेले दुसऱ्या फळीचेही सक्षम नेते आहेत.'' 
- आमदार उदय सामंत

Web Title: election campaigning starts in ratnagiri