Loksabha 2019 : विदेशातील मालमत्ताही दाखवावी लागणार

तुषार सावंत
मंगळवार, 19 मार्च 2019

कणकवली - लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता स्वतःच्या माहितीसोबत आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असून, कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील मालमत्ताही दाखवावी लागणार आहे.

कणकवली - लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता स्वतःच्या माहितीसोबत आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असून, कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील मालमत्ताही दाखवावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या आर्थिक प्रगतीची माहीती संकेतस्थावरून मतदारांना पाहता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारी अर्जामध्ये काही बदल केला आहे. उमेदवारांना स्वतःची माहिती देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची सक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्जामध्ये उमेदवाराला वैयक्तिक माहिती भरून द्यावी लागते. त्यामध्ये उमेदवाराच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ही माहिती असते. त्या प्रत्येक सदस्याच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती देणे आवश्‍यक आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली विदेशातील गुंतवणूक आणि बॅंकांकडे असलेली थकबाकी याचाही तपशील सादर करावा लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती द्यावी लागणार आहे. उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या बॅंक खात्यांवरही नजर ठेवली जाणार आहे.

कुटुंबातील सदस्याच्या खात्यांतून मोठी रक्‍कम काढण्यात आली किंवा भरण्यात आली, तर त्याचा तपशील बॅंकांना आयोगाकडे द्यावा लागणार आहे. त्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून उमेदवाराच्या संपत्तीचा तपशिल प्रतिज्ञापत्रावर घेतला जात होता. ती माहिती संकेतस्थळावर जाहीरपणे दिली जात होती. त्यामुळे मतदारांना एखाद्या उमेदवाराच्या मालमत्तेचे तपशिल समजत होते; पण आता कुटुंबाचीच माहिती उमेदवाराला द्यावी लागणार असल्याने खऱ्या अर्थाने त्या उमेदवाराचा पाच वर्षातील आर्थिक प्रगतीचा आढावा मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election commission new rules