Loksabha 2019 : व्हॉट्‌सॲपवर प्रचार प्रकरणी बांदिवडेकर यांना आयोगाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

रत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

रत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

निवडणूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी व्हॉट्‌सॲपवर प्रसिद्धिपत्रक टाकले आहे. येत्या २४ तासांत याचा खुलासा करा; अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटिशीत स्पष्ट केले आहे. हा प्रकार माध्यम नियंत्रण समितीच्या निदर्शनास आला. कोणतेही पत्रक, जाहिरात किंवा अन्य काही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यापूर्वी निवडणूक विभागाकडून त्याची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. 
या नियमाचा भंग केल्याचा प्रकार माध्यम नियंत्रण समितीपुढे आला. महाआघाडीचे उमेदवार बांदिवडेकर यांनी व्हॉट्‌सॲपवर प्रचार पत्रक टाकले आहे. 

निवडणूक विभागाची परवानगी न घेता परस्पर पत्रक सोशल मीडियावर टाकल्याने त्यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२७ (अ) चा भंग केल्याने १७५ (आय) अन्वये आपल्यावर का गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, असे नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे. येत्या २४ तासांत खुलासा करावा; अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. पत्रकावर मतदानाची चुकीची वेळ टाकण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली. यापूर्वी निवडणूक आयोगाने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांनाही नोटीस बजावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission notice to Navinchandra Bandivadekar