महावितरणच्या दुर्लक्षामुळे पुरवठा विस्कळीत

महावितरणच्या दुर्लक्षामुळे पुरवठा विस्कळीत

सिंधुदुर्गनगरी - महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच जिल्ह्यातील अनेक गावांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गंजलेले खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या आणि यावर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यापूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

जिल्हा हा डोंगराळ भागात समावलेला आहे. येथील डोंगर कपारीत वसलेल्या वाड्यांतर्गत विद्युतीकरणाचे जाळे पसरलेले आहे. त्यासाठी झाडाझुडपातून विद्युत वाहिन्या नेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विद्युत पुरवठा होऊन कित्येक वर्षे लोटली तरी महावितरण कंपनीकडून केवळ वीजबिल भरमसाठ आकारण्या व्यतिरिक्त कोणतेही आधुनिक बदल केलेले नाहीत किंवा कोणतीही सुधारणा केलेली दिसून येत नाही. कित्येक वर्षापूर्वी घालण्यात आलेले लोखंडी खांब बदलण्यात आले नसल्याने ते आता गंजले आहेत. कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहेत तर विद्युत वाहिन्याही जुन्या झाल्याने त्या वारंवार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोकाही वाढला आहे.जिल्ह्यात बऱ्याच भागात अद्याप २५ ते ३० वर्षापूर्वी घालण्यात आलेले लोखंडी खांब आजही वाकलेल्या स्थितीत पहायला मिळत आहेत. दोन लोखंडी खांबामधील अंतर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने आणि वीज कर्मचाऱ्यांकडून योग्यवेळी त्याची देखभाल होत नसल्याने सद्यस्थितीत अनेक ठिकाणी वाहिन्या लोंबकळताना दिसत आहेत. विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यातून गेल्या आहेत; मात्र याकडे महावितरण कंपनीचे कर्मचारी डोळेझाक करत आहेत. यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत.

जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी असलेला विद्युत पुरवठा सुमारे ३० वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत विस्तारीत केली. मात्र यावेळी वापरलेले विद्युतीकरणाचे साहित्य आजही बदललेले नाही. यामुळे पावसाळ्यात किरकोळ वादळी वाऱ्यातही यंत्रणा जमीनदोस्त होताना दिसत आहे. वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांकडून दामदुप्पट वीज बील आकारले जात असतानाही वीज यंत्रणेतील डागडुजीवर त्या प्रमाणात खर्च होताना दिसत नाही. त्यामुळे गावागावातील वीज पुरवठा धोकादायक बनला आहे. वारंवार खंडीत होणारा वीज पुरवटा सुरळीत करण्याबाबत महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाळा तोंडावर तरीही कामे नाहीत
काही दिवसावर पावसाळा येऊन ठेवला आहे. तरीही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरण कंपनीकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. विद्युत खांब आणि वाहिन्यांवर झेपावलेली झाडे व फांद्या तोडून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व विद्युत प्रवाह सुरळीत करण्याची गरज आहे. न पेक्षा येत्या पावसाळ्यात वादळी वारा, मुसळधार पाऊस, पूर अशा नैसर्गिक आपत्तीबरोबरच जिल्ह्यातील सडलेल्या नादुरुस्त झालेल्या वीज पुरवठा एक आपत्ती ठरणार आहे. तरी याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देतील काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com