कुणी बांगडे मासे घेता का.. मासे

 कुणी बांगडे मासे घेता का.. मासे

मालवण - कुणी बांगडे मासे घेता का.. मासे अशी म्हणण्याची वेळ काल सायंकाळी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर आल्याचे दिसून आले. विजेचा प्रचंड लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटामुळे शहर, परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने बर्फाअभावी अनेक मत्स्य व्यावसायिकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरविल्याने मच्छीमारांवर ही वेळ ओढवली.

मासळी ही नाशवंत असल्याने मच्छीमारांना व्यावसायिकांपर्यत मासळी न्यावी लागल्याचे दिसून आले. अखेर 25 ते 40 रुपये किलो दराने मच्छीमारांना आपली मासळी विकावी लागली. 

काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह, विजेच्या लखलखाटामुळे शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. सुमारे तीन तास वीज पुरवठा खंडित झाल्याने मासळीसाठी आवश्यक असलेला बर्फ मत्स्य व्यावसायिकांना उपलब्ध झाला नाही. त्यामुळे समुद्री तुफानाशी झुंज देत मासेमारी करत बंदरात परतलेल्या मच्छीमारांना मिळालेला बांगडा तसेच अन्य प्रकारची मासळी खरेदीसाठी एकही मत्स्य व्यावसायिक बंदरात न आल्याने मच्छीमार चिंतेत पडले.

अनेक व्यावसायिकांनी मासळी घेण्यासाठी बर्फ तसेच टफ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मिळालेल्या मासळीचे करायचे काय? असा प्रश्‍न मच्छीमारांना पडला. 
मासळी ही नाशवंत असल्याने एवढी मेहनत घेऊन पकडलेली मासळी वाया जाण्याची भीती मच्छीमारांमध्ये होती. यात काही किरकोळ विक्रेत्यांनी ही मासळी खरेदी करण्याचे धाडस दाखविले. मात्र परवापर्यंत 50 रुपये किलोपर्यंत वधारलेला दर कमी झाल्याने 25 ते 40 रुपये किलो दराने काही ठराविक व्यावसायिकांनी मासळी खरेदी केली. त्यामुळे याचा मोठा फटका मच्छीमारांना बसला. लिलावाच्या ठिकाणी मुबलक मासळी मात्र मत्स्यव्यावसायिक कमी अशी परिस्थिती पहावयास मिळाली.

मासळीसाठी आवश्यक असलेले टफ उपलब्ध होत नसल्याने मच्छीमारांना आपल्या मासळीची विक्री व्हावी यासाठी व्यापार्‍यांना शोधावे लागत होते. शिवाय मासळीचे टफ मिळवित मासळी व्यापार्‍यापर्यत नेऊन द्यावी लागत असल्याचे दिसून आले.

दोन-तीन दिवसांपूर्वी स्थानिक पर्ससीनधारकांना बांगडा तसेच अन्य मासळीची मोठी कॅच मिळाली होती. या मासळीची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने मासळीचा दर घसरल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. 

देवमाशाचे दर्शन
अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे समुद्री वातावरणातही बदल झाल्याचे दिसून आले. यात समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांना देवमाशाच्या पिल्लाचे दर्शन झाले. मत्स्यहंगामात किनार्‍यालगतच्या समुद्रात देवमाशाचे दर्शन हा शुभसंकेत असल्याचे मच्छीमार मानतात. यातच काल किनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात मासळी सरकली होती. समुद्रातंर्गत बदलामुळे खडकाळ भागाचा आधार मासळीने घेतल्याने स्थानिक मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळाली. मात्र बर्फाअभावी त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com