हत्तीने रोखले अंत्यसंस्कार

हत्तीने रोखले अंत्यसंस्कार

दोडामार्ग - वयाची शंभरी पार केलेल्या आजीवर काल मध्यरात्री होणारे अंत्यसंस्कार हत्तींच्या कळपाने अडीच तास रोखले. अखेर स्मशानभूमीच्या आजूबाजूला तीन-चार ठिकाणी मोठा जाळ करून हत्तींना दूर ठेवत पहाटे अडीच वाजता गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार उरकून घेतले. हा प्रकार मोर्ले येथे घडला. 

मोर्लेतील काशीबाई राघोबा चिरमुरे (वय १०५) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांची कळपाने ऐन मध्यरात्री त्रेधा उडवली. गेले अनेक दिवस हत्तींचा कळप आणि एक टस्कर वीजघर, घाटीवडे, बांबर्डे, केर, मोर्ले, पाळये, सोनावल, घोटगेवाडी परिसरात वावरत आहे. तीन हत्तींचा कळप काल रात्री मोर्लेत घुसला. 

साधारणपणे अकराच्या दरम्यान तो सरस्वती सगुण मसूरकर, विजय पांडुरंग रेडकर यांच्या बागेत नुकसान करत होता. दरम्यान, तेथील काशीबाई चिरमुरे यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकरी स्मशानात लाकडे घेऊन जात होते. लाकडे तोडण्यापासून गोळा करून ती स्मशानात नेण्यापर्यंतची कामे सुरू असतानाच स्मशानभूमी जवळच्या बागायतीत हत्तींचे ओरडणे आणि बागायतीतील केळी, पोफळी आणि भेडलेमाड ढकलून जमीनदोस्त करतानाचे आवाज येत होते. त्यामुळे चितेची तयारी करण्यास कुणी धजावेनात. जवळपास दोन-अडीच तास तसेच गेले. अखेर काही धाडसी गावकऱ्यांनी स्मशानभूमीच्या चारी बाजूला मोठा जाळ करून चिता रचली आणि अखेर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

सकाळी हत्तींचा तो प्रताप तालुकाभर पसरला. कळपाने मसूरकर यांच्या ऐंशी पोफळी आणि रेडकर यांचे पाच कवाथे जमीनदोस्त केले. श्रीमती मसूरकर यांच्या पतीने मृत्यूपूर्वी बाग उभी केली होती, ती हत्तींनी क्षणार्धात उद्‌ध्वस्त केली. त्यानंतर काही गावकऱ्यांनी वनविभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि मोर्ले गावाला भेट देण्याची आणि हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

दरम्यान, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल ए. पी. गमरे यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस, कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, अजित गवस, रमेश गवस, नुकसानग्रस्त शेतकरी आणि गावकरीही उपस्थित होते. गोपाळ गवस आणि मोर्ये यांनी हत्ती पकड मोहीम तत्काळ राबवण्याची मागणी श्री. चव्हाण यांच्याकडे केली.    
  
सिक्कीमचे पथक मोर्लेत
सिक्कीम येथील वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने आज हत्तीनुकसानग्रस्त भागाला भेट दिली. या वेळी त्यांनी हत्तींकडून केले जाणारे शेती बागायतीचे नुकसान, त्यांच्या सवयी, त्यांचा नुकसान करण्याचा कालावधी, त्यांच्याकडून लक्ष केली जाणारी शेती बागायती आदींबाबत माहिती घेतली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com