Ratnagiri Dam Mishap : अश्रू सुकत नाहीयेत इथे; रोज काळीज भेदलं जातंय!

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 6 July 2019

तिवरे धरण फुटल्याने 13 घरे जमीनदोस्त झाली. दोन अर्धवट मोडली. मात्र, ते एकूण 46 संसारांना याची झळ लागली आहे. 23 बेपत्ता लोकांपैकी 18 मृतदेह हाती लागले आहेत. एकेक मृतदेह हाती लागतो. तसतसा तो ज्या कुटुंबातील आहे, त्याचे सगे सोयरे टाहो फोडतात. ते दृष्य काळीज भेदणारे असते.

चिपळूण : तिवरे धरण फुटल्याने 13 घरे जमीनदोस्त झाली. दोन अर्धवट मोडली. मात्र, ते एकूण 46 संसारांना याची झळ लागली आहे. 23 बेपत्ता लोकांपैकी 18 मृतदेह हाती लागले आहेत. एकेक मृतदेह हाती लागतो. तसतसा तो ज्या कुटुंबातील आहे, त्याचे सगे सोयरे टाहो फोडतात. ते दृष्य काळीज भेदणारे असते. एका बाजूला दोन दिवस रडून अश्रू सुकले, असे वाटावे. तोच कोणाचा तरी हंबरडा काळीज भेदून जातो. गेल्या दोन दिवसात शाळेच्या सभागृहात सातत्याने हा प्रकार सुरू आहे. 

वाचलेल्यांपैकी 40 लोकांचे स्थलांतर शाळेच्या हॉलमध्ये केले आहे. काळरात्री पाठोपाठ त्यांची कालची रात्रही भयाणच गेली. हरवलेल्या आप्तांची चिंता, त्यातील कोणी जिवंत असेल का, अशी अंधुकशी आशा आणि त्याचबरोबर परत येणे कठीण, असे बजावणारे स्वकीय! अशा तऱ्हेने रात्रभर एकमेकांचे सांत्वन करीतच सारे जागेच होते. आपले अश्रू सुकलेत, असे वाटावे, तो शेजारच्याची अवस्था तीच. कोणी, कोणाचे सात्वन करायचे?

घटना कळल्याला 10 तास उलटल्यापासून सात्वनासाठी आणि भेटण्यासाठी येणारे नातेवाईक यांच्यामुळे दुःखाचे कढ पुन्हा पुन्हा येत होते. येणारे शब्दांनी धीर द्यायचा प्रयत्न करीत होते. मात्र, गेलेला आणि गमावलेले यातील काहीच परत येणार नाही. हे त्या साऱ्यांना ठाऊक होते. या दु:खातही बोलताना धरणासबंधी शासकीय यंत्रणेची चीड मधून मधून उफाळून येत होती. माध्यमांशी बोलताना ती प्रकर्षाने जाणवत होती. बसलेली एखादी महिला आपले रडे आवरत तावातावाने सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत होती. 

तीन धरणे कधीही फुटू शकतात; पण दुरूस्ती पावसाळ्यानंतर!

जगण्याचा त्यांचा संघर्ष... 
तरूण मुलगे आणि महाविद्यालयीन युवती सरकारी यंत्रणा आणि माध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय पुढारी यांना थेट प्रश्‍न विचारत होते. काही वेळा अनुत्तरीत करीत होते. तर काही वेळा फटकारतही होते. जगण्याचा त्यांचा संघर्ष त्यांच्या परीपरीने असा कालपासूनच सुरू झाला आहे.