एमआयडीसीत मंदीनंतर संधी ; ४०० जणांना मिळणार रोजगार
आता दळणवळण सुरू झाल्यामुळे कारखानदारांनी पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे.
चिपळूण : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर हळूहळू उद्योगाची चाकेही रूळावर येत आहेत. खेर्डी, खडपोलीसह लोटेतील उद्योजकांनी पूर्ण क्षमतेने ऊत्पादन सुरू केले. त्यामुळे अनेकांचा रोजगार वाचला आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीत नवीन कंपन्या येऊ घातल्या. त्यामुळे मंदीनंतरची संधी लोटे एमआयडीसीत निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले उत्पादन बंद केले तर काहींनी शासनाची परवानगी घेऊन सुरू ठेवले. लोटेतील कृषी उत्पादन आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या बंद राहिल्या तर त्याचा परिणाम भारताच्या कृषी व आरोग्यक्षेत्रावर पडणार होता. त्यामुळे येथील कारखानदारी सुरू होती. रासायनिक द्रव्य तयार करून विदेशात पाठवणाऱ्या लोटेतील कंपन्याही लॉकडाउनमध्ये सुरू होत्या.
हेही वाचा - जयंत पाटलांकडुन तटकरेंची पाठराखण; प्रत्येकाने मर्यादा ओळखुन राहावे -
देशातील विमान सेवा, बंदर आणि दळणवळणची इतर सेवा बंद होती. कंपनीत तयार झालेला माल पाठवण्यास अडचणी येत असल्याने नंतरच्या काळात उत्पादनाचे प्रमाण कमी करण्यात आले. लोटेसह, खडपोली आणि खेर्डीतील कारखान्यांमध्ये कोरोनाची लागण झाली. तरीही कामगार जिवावर उदार होऊन कंपनीत जात होते. काहींनी कंत्राटी कामगारांची कपात केली.
कायमस्वरूपी कामगारांना निम्म्या पगारावर काम करण्याचा पर्याय दिला. त्याला कामगारांकडून विरोध झाला. कामगार संघटनांनी मध्यस्थी केल्यानंतर कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. आता दळणवळण सुरू झाल्यामुळे कारखानदारांनी पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. लोटेतील उद्योजक एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करीत आहेत.
मोठी गुंतवणूक होणार
अतिरिक्त लोटे एमआयडीसीत कोळंबीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प येत आहे. त्याचे स्थानिकांनी स्वागत केले. या प्रकल्पामुळे मोठी गुंतवणूक होणार असून, किमान ४०० तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.
हेही वाचा - पाटबंधारे प्रकल्पात कोकणाला प्राधान्य -
...याची झाली सुरवात
- कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यास प्रारंभ
- मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करणाऱ्या कंपन्या
खेर्डी व खडपोलीत
- काही छोट्या कंपन्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून
कंपन्यांना पुरवतात
- काही दिवसांपासून त्या छोट्या कंपन्याही झाल्या सुरू
"छोट्या कंपन्यांना मोठ्या कंपन्यांकडून मालाची ऑर्डर दिली जात नसल्याने कामगार घरी बसून होते. मात्र, आता ऑर्डर पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. त्यामुळे कामगारांना पुन्हा बोलाविले जाते."
- प्रकाश आंब्रे, लोटे
संपादन - स्नेहल कदम