अतिक्रमणावर हातोडा अन् सुरू झाली बाचाबाची

भूषण आरोसकर
Wednesday, 29 July 2020

ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई व परिसरातील बाहेर बसणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली असल्याने गेली काही दिवस मतमतांतरे व्यक्त केली होत आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमणावर हातोडा मारून संत गाडगेबाबा भाजी मंडळीच्या पार्किंग व्यवस्था शेजारी भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. यावेळी पालिका कर्मचारी व एका विक्रेत्यामध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. जागेचे भाडे भरतोय पालिकेच्या नियमांचे पालन करतोय, आम्ही कुठे जायचे ? काय खायचे कारवाई करायची असल्यास समान करा, अन्याय करू नका अशी व्यथा त्याने मांडली. या प्रकारामुळे घटनास्थळी गर्दी व तणावपूर्वक स्थिती निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. 

गेल्या काही दिवसापासून संत गाडगेबाबा मंडई परिसरात पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमणे हटवली असून रस्ता खुला केला आहे. सर्वानाच मंडईत जागा बसण्यास दिल्याचा असा दावा केला आहे. काही गाळे धारकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे असे सांगण्यात येत आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई व परिसरातील बाहेर बसणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली असल्याने गेली काही दिवस मतमतांतरे व्यक्त केली होत आहेत.

आज पुन्हा भाजी मंडई शेजारी असलेल्या अतिक्रमण पालिकेने हटवून याठिकाणी मोकळ्या जागेत बसणाऱ्यांना भाजी मंडईमध्ये जागा देऊन दुचाकी वाहन पार्किंगसाठी जागा केली. हे अतिक्रमण हटवितेवेळी आज मंडईमधील एका विक्रेत्याने आपले दुकान हटविण्यास विरोध केला. यावेळी पथक आणि या विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली. 

विक्रेत्याचा इशारा 
पोलिसही घटनास्थळी आले; मात्र विक्रेता त्या ठिकाणावरून बाजूला हटला नाही. घटनास्थळी नागरी कृती संघर्ष समितीचे तसेच स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, इतर विक्रेते आणि नागरिक दाखल झाले. यावेळी त्या विक्रेत्याने आपले दुकान एकच आहे, आम्ही पालिकेचे भाडे भरतोय, न्याय करायचा असेल तर सर्वांशी एकसमान करा, दुकाने हटविल्यास आम्ही करायचे काय, खायचे काय आपल्या दुकान हटविल्यास आपण आपल्या जीवाचे बरे वाईट करू, असा इशारा यावेळी पथकाला दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment action sawantwadi konkan sindhudurg