खारेपाटणमध्ये जमावाकडून अभियंत्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कणकवली - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, वाहनचालक शैलेश कांबळे यांना खारेपाटण येथे जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या रस्ता कामगारालाही मारण्यात आले.

कणकवली - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, वाहनचालक शैलेश कांबळे यांना खारेपाटण येथे जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या रस्ता कामगारालाही मारण्यात आले.

बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात हा उद्रेक होता, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे, तर काहींनी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास खारेपाटण शासकीय विश्रामगृहाच्या आवारात घडला.

रत्नागिरी येथे टेंडर ओपनिंगच्या कामासाठी मी जात होतो. यावेळी खारेपाटण सरपंच यांनी मला रेस्ट हाऊसजवळ या असे सांगितले, मात्र तेथे गेल्यावर गाडीतून बाहेर पडत असताना मला हाताच्या बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आली. हा पूर्वनियोजित कट होता.’’
- प्रदीप व्हटकर,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

खारेपाटण घोडेपाथर बंदरगा येथे शासकीय विश्रामगृह आहे. तेथील जुनाट वडाचा वृक्ष आज सकाळी सातच्या सुमारास उन्मळून पडला. ही माहिती खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. व्हटकर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर सहायक अभियंता श्री. तावडे व अन्य सहकारी खारेपाटण येथे पोचून वडाचा वृक्ष बाजूला करत होते. झाड पडले तेव्हा तेथून शाळकरी मुले जात होती. सुदैवाने ती बचावली, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सकाळी घडलेल्या प्रकारानंतर खारेपाटण परिसरातील पंधरा ते वीस जणांचा जमाव शासकीय विश्रामगृहाजवळ उभा होता. याचवेळी कार्यकारी अभियंता श्री. व्हटकर हे रत्नागिरी येथे जात होते.

सरपंच श्री. राऊत यांनी त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. विश्रामगृहाच्या आवारात गेले असता तेथे जमाव होता. गाडीतून बाहेर येत असताना जमावातील एकाने त्यांच्या 
शर्टाला हात घालून बाहेर घेतले. एकाने सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आपले शर्टही फाडण्यात आले, असे श्री. व्हटकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्यासोबत असलेले गाडीचालक शैलेश कृष्णा कांबळे यांनाही जमावाने मारहाण केली. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या कामगाराच्या हातातील मोबाईल काढून घेऊन त्यालाही मारहाण केली. 

याबाबत श्री व्हटकर म्हणाले, ‘‘ही मारहाण पूर्ववैमनस्यातून असावी. यातील एक व्यक्ती ही माझ्या परिचयाची होती. ती यापूर्वी माझ्याकडे कार्यालयात येऊन गेली होती. त्या व्यक्तीचे कामाचे बिल आदा करण्यात आले नव्हते. शाखा अभियंत्यांनी त्यांच्या बिलाचे रेकॉर्डिंग केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी ती व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्याच व्यक्तीने मी गाडीतून बाहेर पडत असताना शिवीगाळ करून मला गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. जमाव मोठा होता, मात्र त्यातील चार जणांनी मला मारहाण केली.’’

खारेपाटण घोडेपातर बंदर येथील रस्त्यावर धोकादायक जुनाट झाड होते. ते काढून टाकावे, असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकामला मी दिले होते; मात्र याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. या निष्काळजीपणामुळे झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र घटनास्थळी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. व्हटकर यांनी जी भाषा वापरली, त्यामुळे केवळ शाब्दिक चकमक उडाली. बाकी काही घडलेलं नाही.
- रमाकांत राऊत
, सरपंच, खारेपाटण

 

Web Title: Engineer Hitting by mob in Kharepatan