नाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार

राजेश कळंबट्टे | Wednesday, 23 September 2020

सात मीटर भाग होता ढासळला; प्रतिकुल निसर्गाशीही दोन हात

रत्नागिरी : मुसळधार पाऊस, भुसभुशीत झालेली माती, डोंगरातील झरे अशा प्रतिकुल परिस्थितित कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे (पेर्णेम) टनेलची दुुरुस्ती म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याची आणि प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या क्षमतेची कसोटी होती. लोखंडी कमानीसारखे बिम आणि प्लेटस् यांची तीस मीटरची भिंत बोगद्यात उभारण्यात आली. जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात अथक प्रयत्नांनी ढासळलेला सात मीटरचा भाग दुरुस्त केला. गाड्यांची वाहतूक असतानाही आज काम सुरुच आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे (पेर्णम) टनेल येथील डोंगर भुसभशीत असून माती धरुन ठेवण्यासाठी दगडच नाहीत. 6 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे या टनेलमधील सुमारे सात मीटरचा भाग जणू भगदाड पडल्यासारख ढासळला. यावेळी रेल्वे वाहतुक बंद होती. या मार्गावरील मालगाड्या आणि परराज्यातून येणार्‍या काही मोजक्या गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या. रत्नागिरीतील गणेश कन्स्ट्रक्शन, गोव्यातील रामदेव इंजिनिअरिंग आणि हैद्राबादमधील विष्णु इन्फ्रा या तिन एजन्सीजकडे हे काम सोपवण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि झर्‍यांमुळे भुसभूशीत मातीचा चिखल यामुळे तसेच दुरुस्तीचे काम चिंचोळ्या आणि बोगद्याच्या रुंदीएवढ्या पाच मीटर जागेत करावयाचे होते. दुरुस्तीत पावसाचा अडथळाच होता.

रुळावरील माती काढली तसेच काँक्रीट कापून काढावा लागले. रुळांखालील खराब भाग बाजूला काढण्यात आला. पुन्हा माती येऊ नये म्हणून भगदाडाच्या ठिकाणी लोखंडी बिम उभे केले. बोगद्याच्या भिंतीला उभारलेल्या दोन बिमच्या मध्ये काँक्रीट टाकण्यात आले. माती येऊ नये यासाठी 40 मिलीमीटर जाडीच्या लोखंडी प्लेट बसविण्यात आल्या. मजबुतीसाठी बीम आणि प्लेटला वेल्डींग केले. डोंगरातील मातीचा कितीही दबाव आला तरीही तो सहन करेल एवढे मजबुत काम येथे केले. रोज चोविस तास याप्रमाणे एक महिना काम करत अभियंता दिनी टनेलमधून वाहतुक सुरु झाली. अजुनही किरकोळ काम रेल्वे गाड्यांची सुरु झाल्यानंतरही केले जात आहे. असे प्रथमच घडत आहे.

हेही वाचा- शिवसेना म्हणजे धगधगते अग्नीकुंड  शिवसेनेच्या नादाला लागाल तर संपून जाल -

 

कोरोनासह तुफानी पावसाचे आव्हान

पेर्णम येथे 15 ऑगस्टपर्यंत सरासरी 4500 मिमी पावसाची नोंद झाली. गोव्याची वार्षिक सरासरी 2900 मिमी आहे. त्यामुळे येथे कोणत्या परिस्थितीत काम करावे लागले याचा अंदाज येईल असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. पावसाबरोबरच कोरोनापासून कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान पेलण्यासाठी कोकण रेल्वेचे वैद्यकीय पथक कोणत्याही क्षणी सज्ज होते.

 

पावसामुळे प्रतिकुल परिस्थिती होती. काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्याला सामोरे जात पेडणे टनेल वाहतुकीसाठी सुरक्षित केला.

- राजू सावंत, ठेकेदार

संपादन - अर्चना बनगे