एन्जाॅय... पण सांभाळून!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

अलिबाग - थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने; तसेच पोलिस प्रशासनाने भरारी पथके स्थापन केली आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री क्‍लब, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, रिसॉर्ट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. अशा पार्टीत गैरवर्तणूक झाल्यास हॉटेलमालकांना जबाबदार धरले जाणार असल्याने ‘एन्जॉय... पण सांभाळून’ असा सल्ला दिला जात आहे.  

अलिबाग - थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने; तसेच पोलिस प्रशासनाने भरारी पथके स्थापन केली आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री क्‍लब, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, रिसॉर्ट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. अशा पार्टीत गैरवर्तणूक झाल्यास हॉटेलमालकांना जबाबदार धरले जाणार असल्याने ‘एन्जॉय... पण सांभाळून’ असा सल्ला दिला जात आहे.  

नववर्ष स्वागत पार्ट्यांसाठी पहाटेपर्यंत परवानगी द्यावी, अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती. ती मान्य झाली असली, तरी त्यांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. याकडे जिल्हा प्रशासनाची भरारी पथके, पोलिस; तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे.

नाक्‍या-नाक्‍यावर असलेली मद्याची दुकाने रात्री १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे मद्यदुकानांचे मालक नाराजी व्यक्त करीत आहेत. पार्ट्यांमध्ये पाच वाजेपर्यंत मद्य विकले जाईल तर मद्यविक्री दुकानांना एक वाजेपर्यंतच परवानगी का, असा त्यांचा प्रश्‍न आहे. 

पार्ट्यांसाठी व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. २८ डिसेंबरपर्यंत तीन व्यावसायिकांना रीतसर परवानगी देण्यात आली. जिल्ह्यात जवळपास २० ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना दोन हजारांपासून पुढे रक्कम मोजावी लागणार आहे. पार्ट्यांसाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी मद्य ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी आयोजकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केले आहेत. आतापर्यंत अशा २० पार्ट्यांमध्ये मद्य ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

आयोजकांसाठी नियम 
थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजक, रेस्टॉरंट, क्‍लबमालकांनी ३१ डिसेंबरला खासगी सुरक्षारक्षक तैनात करून पार्टीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

हॉटेलच्या आतील अथवा बाहेरील बाजूस कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी हॉटेलचालकांवर राहील.

वेळेच्या बंधनामधील शिथिलता संगीत कार्यक्रमासही आहे; मात्र ध्वनिप्रदूषण कायदा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

सार्वजनिक शांतता; तसेच कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून योग्य वाटल्यास वेळेच्या बंधनांतील शिथिलता नाकारण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत.

या सगळ्या नियमांचे पालन होणार असेल, तरच पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट अथवा क्‍लब सुरू ठेवता येईल.
 

किनारे-डोंगरांना स्थानिकांची पसंती 
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यावसायिक विविध कल्पना राबवत आहेत. त्याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे; मात्र स्थानिकांनी अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी रात्री समुद्रकिनारी किंवा डोंगरावर; तसेच बारमध्ये पार्ट्यांचा बेत केला आहे.

Web Title: enjoy but carefully