बॅंक शाखाधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

मालवण - राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एका शाखाधिकाऱ्याकडून ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याने संबंधित शाखा व्यवस्थापकांची विभागीय कार्यालयाने चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती छोटू ठाकूर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर तसेच ग्राहकांच्यावतीने महेश बागवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनातील आशय असा : संबंधित शाखाधिकाऱ्याकडून पंचक्रोशीतील ग्रामस्थ, खातेदार, व्यापारी व कर्जदार यांना योग्य प्रकारची सेवा दिली जात नसून या शाखेतील खातेदारांना आपली खाती बंद करून दुसऱ्या शाखेत खाते उघडण्यास सांगितले जात आहे.
शैक्षणिक व महिला बचत गटांचे प्रस्ताव केले जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी यापूर्वी रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून याची कल्पना दिली आहे. रत्नागिरी येथील कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्याला समज दिल्यानंतरही त्यांच्या कृतीत बदल झालेला नाही. ग्राहकांना सूचना न देता बचत खाते तात्पुरते बंद करणे, बंद केलेले सीसी खाते ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता सुरू करणे, ऍट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखविणे, आदी उपद्‌व्याप या शाखाधिकाऱ्याकडून सुरू आहेत. या बॅंकेच्या शाखेतील शाखाधिकारी हे ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून खातेदारांना अडकवू शकत असल्याने त्वरित वरिष्ठ अधिकारी पाठवून खातेदार, लोकप्रतिनिधी, व्यापारी वर्ग, संस्थाचालक, देवस्थान समिती यांची सहविचार सभा घेऊन योग्य तो तोडगा काढण्याची मागणी बागवे यांनी केली आहे.

Web Title: Enquiry of Bank Manager