खारेपाटणात जिल्ह्याचे प्रवेशद्वार उभारणार - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

खारेपाटण - चांदा ते बांदा योजनेंतर्गत खारेपाटण येथे एक कोटी रुपये खर्च करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. याखेरीज इथे असलेले भारतातील दुसरे सूर्य मंदिर, पुरातन कालभैरव मंदिर, खारेपाटण बंदर यांचाही विकास करून खारेपाटणला पर्यटकांची पंढरी बनविणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

खारेपाटण - चांदा ते बांदा योजनेंतर्गत खारेपाटण येथे एक कोटी रुपये खर्च करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. याखेरीज इथे असलेले भारतातील दुसरे सूर्य मंदिर, पुरातन कालभैरव मंदिर, खारेपाटण बंदर यांचाही विकास करून खारेपाटणला पर्यटकांची पंढरी बनविणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.
येथील नूतन एस.टी. बसस्थानकाचे उद्‌घाटन आज पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, सरपंच तृप्ती माळवदे, एस.टी.चे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, सागर पळसुले, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र शेटये, बाळा भिसे, संदेश पारकर, महेश कोळसूलकर, भाऊ राणे, शरद वायंगणकर, राजश्री धुमाळे, कांताप्पा शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेपाटण बसस्थानक राज्यातील आदर्शवत बसस्थानक ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. गेली अनेक वर्षे खारेपाटण शहरालगतच्या सुख नदीपात्रातून विजयदुर्ग बंदरापर्यंत जलवाहतूक सुरू होती. आता पर्यटनाच्या माध्यमातून जलवाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे.  संत गाडगेबाबांनी खारेपाटण शहरात स्वच्छतेचा संदेश दिला होता. त्यांचाही वारसा इथे जपूया, असे आवाहन त्यांनी केले.

बसस्थानक उद्‌घाटन कार्यक्रमात खारेपाटण बसस्थानकासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते कांताप्पा शेटये, भाऊ राणे, गोट्या कोळसूलकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण स्थानकातील स्वच्छता करणाऱ्या सुवर्णा पाटणकर यांचाही विशेष सत्कार झाला. या वेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून होणाऱ्या स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी केले. तर सूत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले. आभार लवू गोसावी यांनी मानले.
 

प्रमोद जठार यांच्या प्रयत्नांचे कौतुक
खारेपाटण बसस्थानकाचा प्रश्‍न गेली ३५ वर्षे रेंगाळत पडला होता. तो सोडविण्यासाठी प्रमोद जठार यांनी पुढाकार घेतला. येथील महसूलच्या जमिनीचे एस.टी. महामंडळाकडे हस्तांतर, त्यानंतर मंत्रालय पातळीवर सतत पाठपुरावा तसेच खारेपाटण बसस्थानकासाठी १५ लाख रुपयांचा आमदार निधी दिलेल्या माजी आमदार प्रमोद जठार यांचे पालकमंत्री श्री. केसरकर, राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.

सावंतवाडी बसस्थानकासाठी पाच कोटी
सिंधुदुर्गातील सर्वच बसस्थानके मॉडेल ठरतील यादृष्टीने विकसित केली जाणार आहेत. त्याची सुरवात सावंतवाडी बसस्थानकापासून होणार आहे. पाच कोटींचा खर्च करून सावंतवाडी स्थानकाचे आधुनिकीकरण करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच खारेपाटण येथील सूर्य मंदिराच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येईल, असेही जाहीर केले.

Web Title: The entrance to the district set up kharepatanata