रस्ता खचल्याने 'करूळ' अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

वैभववाडी : करूळ घाटात रस्ता खचल्यामुळे पुढचा पावसाळाभर येथील वाहतुकीवर टांगती तलवार राहणार आहे. दिंडवणेनजीक कोसळलेल्या दरडीमुळे हा प्रकार घडला आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर रस्त्याला भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून रस्त्यालगत बॅरल उभे केले आहेत.

वैभववाडी : करूळ घाटात रस्ता खचल्यामुळे पुढचा पावसाळाभर येथील वाहतुकीवर टांगती तलवार राहणार आहे. दिंडवणेनजीक कोसळलेल्या दरडीमुळे हा प्रकार घडला आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर रस्त्याला भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून रस्त्यालगत बॅरल उभे केले आहेत.

तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दिंडवेणनजीक सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहायाने दरड हटवून काल (ता. 12) दुपारी एक वाजता वाहतूक सुरळीत केली; मात्र दरड कोसळलेल्या रस्त्याचा काही भाग आता खचला आहे. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक ठरणार आहे.
 

पावसाचा जोर असाच राहिला, तर जेथे रस्ता खचला तेथे रस्त्याला भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे घाट वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरणार आहे.
 

करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांमध्ये आतापर्यंत अनेकदा दरडी कोसळल्या आहेत. दरडी कोसळतील अशी अनेक ठिकाणे दोन्ही घाट रस्त्यांमध्ये आहे. गेल्या वर्षभरात एकही बोल्डर नेट दोन्ही घाटांमध्ये लावण्यात आलेली नाही. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण या वर्षी अधिक असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास घाट रस्त्यातून प्रवास धोकादायक ठरणार आहे.
 

करूळ घाट रस्त्यातून अवजड वाहतूक होत असते. खचलेल्या रस्त्याजवळून अशा वाहनांची वाहतूक करणे अधिक धोकादायक ठरू शकते.
 

सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून खचलेल्या रस्त्यालगत बॅरल उभे केले आहेत. यापूर्वीसुद्धा करूळ आणि भुईबावडा घाटात रस्ता खचला होता. तेथील वाहतूक पंधराहून अधिक दिवस बंद राहिलेली आहे. त्यामुळे दरडी कोसळण्यापेक्षा रस्ता खचणे अधिक धोकादायक मानले जाते.
 

दरम्यान, तत्काळ बांधकाम करूळ घाटात जेथे रस्ता खचला आहे, तेथे तत्काळ बांधकाम करणे आवश्‍यक आहे.
 

बांधकाम विभागाला वाली कोण?
बांधकाम विभागाच्या अखत्यारित करूळ आणि भुईबावडा घाट रस्त्यांसह कित्येक महत्त्वपूर्ण रस्ते आहेत; परंतु येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता गेल्या कित्येक दिवसांपासून रजेवर आहेत, तर या कार्यालयातील शाखा अभियंत्यांची दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाचा कारभार रामभरोसेचे आहे. सध्या कणकवली येथील एका शाखा अभियंत्याकडे तात्पुरता कार्यभार दिलेला आहे.
 

गटारांचे पाणी रस्त्यात
रस्ता सुरक्षित राहण्यासाठी दरडीकडील गटारे मजबूत असण्याची गरज असते. काही वर्षांपुर्वी या गटारांचे बांधकामसुद्धा करण्यात आले होते; पंरतु गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ही गटारे दगड माती आणि अन्य गाळाने भरलेली आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई करण्याची गरज होती; मात्र ती तत्परता बांधकाम विभागाने न दाखविल्यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावरून पाणी वाहत आहे. हे पाणी रस्त्याला धोकादायक असून, रस्ता खचण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता अधिक आहे.
 

विजयदुर्ग-कोल्हापूर तिसऱ्या दिवशीही बंद
विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील किरवे, मार्गेवाडी आणि मांडकुली येथे पुराचे पाणी आल्यामुळे हा सोमवार (ता. 11) पासून बंद आहे. पुराचे पाणी अजूनही न ओसरल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मार्ग बंदच आहे. त्यामुळे गगनबावडा ते कोल्हापूर मार्गावर अनेक अवजड वाहने अडकली आहेत. यावरूनच भाजीची वाहतूक होते. ती ठप्प झाल्याने भाज्या महागल्या आहेत.

Web Title: Entry khacalyane 'karula' distress