अागरायनच्या काव्य संमेलनात दुर्मिळ बोली भाषांना पुनरुज्जीवन

अमित गवळे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

या काव्यमैफिलीत वऱ्हाडी, मराठवाडी, मानदेशी आणि सकळ महाराष्ट्राची आवडती असलेली आगरीकोळी बोलीतील कविता देखिल सादर झाल्या. यावेळी कवी सँबी परेरा यांनी लगीन ही उपहासात्मक कुपारी कविता तर बर्नडं लोपी यांनी 'कविचा धाॅक' ही कविता सादर केली. 

पाली : बोली भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी 'आगरायन काव्य संमेलन' उदयास आले. अागरायनची मैफल विरार मधल्या विवा महाविद्यालयात मराठी वाङमय मंडळाच्या कविता पाटील यांच्या संयोजनातुन नुकतीच आयोजीत केली होती. यंदा पहिल्यांदाच एका काव्य मैफलीत वसई-विरार मधील लुप्त होत चाललेल्या सामवेदी-कुपारी या गोड भाषेतील कवितांचे सादरीकरण झाले.

या काव्यमैफिलीत वऱ्हाडी, मराठवाडी, मानदेशी आणि सकळ महाराष्ट्राची आवडती असलेली आगरीकोळी बोलीतील कविता देखिल सादर झाल्या. यावेळी कवी सँबी परेरा यांनी लगीन ही उपहासात्मक कुपारी कविता तर बर्नडं लोपी यांनी 'कविचा धाॅक' ही कविता सादर केली. कवी दीप पारधे यांनी मराठवाडी बोलीत फेसबुकवर लावणी सादर केली आणि रसिकांमध्ये एकच हशा पिकला. याचवेळी कवी सर्वेश तरे यांनी बहिण आणि आईचे महत्व कवितेतुन सांगितले अन मग प्रकाश वानखेडे यांनी वऱ्हाडीत बयनीच पतर आणि कुपारी गायाका मेल्सिना तुस्कानो यांनी पोरी हार्याजात्यावेळी (सासरी जाताना) हे मुलीचं मनोगत कुपारी गीतातुन सादर केलं. शिक्षणाअभावी बाल्याची काय परिस्थितीं होते हे सांगत गजानन पाटील यांनी त्यांच्या विनोेदी वजा शैक्षणीक आगरी कवितेत सांगितले. तर प्रकाश पाटील ह्यांनी थेट कृष्णाला सवाल करीत 'खरा सांग किसना,तुलाच कश्या या गौलनी भुलतान ना मना बगल्याव पाठदाखवुन पलतान, ही विनोदी कविता सादर करीत रसिकांची वाह मिळवली. त्यानंतर वातावरण गंभीर करत सर्वेश तरे यांनी,

राजे तुमच्या जयंतीवरुन रोज रोज वाद होत आहेत.
पिढ्या न पिढ्या जातीजातीत बरबाद होत आहेत
आम्ही फार तर वाढवतो दाढी तुमच्यासारखी,
बाकी तुमची तत्वे इतिहासातुन कायमची बाद होत आहेत.

असे म्हणत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर दीप पारधे यांनी गड-किल्ल्यांची आपण केलेली दुर्देवी परिस्थिती मांडत'महाराज' ही कविता सादर करुन सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. महादेव इरकर यांनी मानदेशी कविता तर निलम पाटील यांनी आगरी कविता सादर केली. मैफलीची सांगता सर्वेश तरे यांनी उबंटु चित्रपटातील गीतकार समीर सामंत यांच्या

हीच अमुची प्राथना अन हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

या गीताने केली आणि त्यात विद्यार्थीही सामील झाले. अशा प्रकारे अागरायनच्या काव्य मैफिलीने सर्वाची मने जिंकली.मैफलीचा पुढील प्रयोग ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाता असल्याचे यावेळी गजानन पाटील यांनी सांगीतले.

 

Web Title: esakal marathi news pali news