रत्नागिरी : देवरुखात एस.टी. वाहकांचे अनोखे आंदोलन ; ३५ फेऱ्या रद्द झाल्याने शेकडो प्रवासी ताटकळले

संदेश सप्रे
बुधवार, 19 जुलै 2017

देवरुख आगारातील एका चालकाचा १५ दिवसापूर्वी अपघात घडला होता. या अपघातानंतर त्याचे म्हणणे ऐकून घेण्या आधीच मंगळवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर आज वाहकांनी 'प्रशासन नियमात वागते मग आम्ही सुद्धा नियमात काम करणार' असे सांगत रिबुक होणे बंद केले.

देवरुख,(जि. रत्नागिरी)- सहकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध देवरुख एस.टी. आगारातील वाहकांनी आज 'रिबुक' होणे बंद केल्याने दिवसभरात ३५ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगारावर ओढवली.

देवरुख आगारातील एका चालकाचा १५ दिवसापूर्वी अपघात घडला होता. या अपघातानंतर त्याचे म्हणणे ऐकून घेण्या आधीच मंगळवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर आज वाहकांनी 'प्रशासन नियमात वागते मग आम्ही सुद्धा नियमात काम करणार' असे सांगत रिबुक होणे बंद केले.

आगारात नियमित कारभार चालवण्यासाठी १३३ वाहकांची गरज असते प्रत्यक्षात १२७ जण कार्यरत आहेत. त्यातील काही जण नियमित रजेवर असल्याने ३५ वाहकाना रिबुक व्हावे लागते. त्यांच्याकडून ४० फेऱ्या चालवल्या जातात. आज सकाळ पासून एकही वाहक रिबुक न झाल्याने दिवसभरातील ३५ बसफेऱ्या रद्द झाल्या. याचा फटका शेकडो प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बसला. मुसळधार पावसात चार-चार तास प्रवासी आपल्या गाडीची वाट बघत उभे होते. वाहक नियमित फेऱ्या चालवत असले तरी त्या दिड दोन तास उशीराने सुरु आहेत. आता वाहक कमी झाल्याने आगारातून सुटणाऱ्या १५ ठिकाणच्या वस्तीच्या फेऱ्या अडचणीत सापडल्या आहेत.

या आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासनासमोर पेच वाढला आहे. वरिष्ठ याकडे लक्ष देत नसल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. याचा फटका साखरपा - संगमेश्वर - माखजन बस स्थानकातील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

Web Title: esakal news sakal news ratnagiri news msrtc news