कोकणातून दररोज हापूसच्या 27 हजार पेट्या वाशीत

कोकणातून दररोज हापूसच्या 27 हजार पेट्या वाशीत

रत्नागिरी - गतवर्षीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन चाळीस टक्‍क्‍यांनी घटले आहे. कोकणातून दररोज 27 हजार पेट्या वाशीत पाठविल्या जात आहेत; मात्र उत्पादन कमी असल्यामुळे बाजारातील दर वधारलेलेच राहणार आहेत. पेटीचा दर सध्या सहा हजार रुपयांपर्यंतच स्थिरावला आहे. दक्षिणेकडील आंब्याची आवकही कमी असल्याने हापूसला मागणी वाढली आहे. दर मिळविण्यासाठी कोवळे फळ बाजारात पाठविले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

वाशीतील बाजार समितीमध्ये मार्च अखेरीला मोठ्या प्रमाणावर कोकणातल्या हापूसची आवक होते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोकणात थंडीचा कडाका वाढल्याने तसेच थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. याचा फटका हापूस उत्पादनाला बसला. नोव्हेंबरमध्ये आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. त्यानंतर जानेवारीत आवक वाढली. पण तुलनेत ती कमीच होती. हापूसचा खरा मोसम होळीनंतरच सुरू होतो. मार्च महिन्यात आवक कशी असेल याकडे व्यापाऱ्यांचे गणित अवलंबून असते.

दरवर्षी मार्चअखेरीला एपीएमसी मध्ये 50 ते 60 हजार पेट्या हापूस दाखल होतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक बागायतदार मोठ्याप्रमाणात मुहूर्त करित असतात. यावर्षी मुहूर्त होईल पण तुलनेत पेट्यांचा आकडा अत्यंत कमी राहील अशी शक्‍यता आहे. सध्या वाशीमध्ये सरासरी 25 ते 28 हजार पेट्या दाखल होत आहेत. जानेवारी महिन्यात आलेल्या मोहोराचा विचार करता अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही. थ्रिप्स, तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर उत्पन्नाची आकडेवारी अवलंबून राहणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढेल अशी शक्‍यता आहे. यावर्षी मे महिन्यातही आंबा कमीच राहणार आहे. उत्पादन कमी राहिल्यामुळे सामान्य ग्राहकाला हापूसच चव आंबटच लागणार आहे. 

"वातारणात अचानक बदल होतात. त्याचा परिणाम हापूसवर होतो. उष्मा वाढल्यामुळे आता फळ तयार होईल. आंबा आतील बाजूस असल्यामुळे यावर्षी आंबा भाजण्याचे प्रमाण कमी आहे.'' 
- प्रसन्न पेठे,
बागायतदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com