ईव्हीएममधील उमेदवार चिन्हे अस्पष्टमुळे हरकत

रुपेश हिराप
Tuesday, 12 January 2021

आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम मात्रे यांच्या उपस्थितीत संबंधित ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 54 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन उमेदवार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या; मात्र ईव्हीएम मशीनच्या मतपत्रिकेवरील उमेदवारांचे चिन्ह अस्पष्ट असल्याची हरकत सर्वांनीच घेतली; मात्र ही चिन्हे निवडणूक आयोगाने ठरविल्याने आपण त्यात हस्तक्षेप करु शकत नसल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्पष्ट केले. 

तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यामध्ये कोलगाव, आंबोली, चौकुळ, मळगाव, तळवडे, डिंगणे, इन्सुली, आरोंदा, आरोस, दांडेली, मळेवाड या ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 111 जरा करतात 265 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम मात्रे यांच्या उपस्थितीत संबंधित ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या.

यावेळी संबंधित ग्रामपंचायतीसाठी निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार आणि पक्षिय पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 12 वाजता या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय निवडण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन व मतपत्रिकेवर चिन्हे याबाबत उमेदवार व उपस्थितांकडून खात्री करून घेत ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या; मात्र ईव्हीएम मशीनवरील मतपत्रिकेवर असलेली उमेदवारांच्या नावासमोर चिन्हे लहान तसेच अस्पष्ट असल्याची हरकत सर्वच ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून करण्यात आली.

याबाबत तहसिलदार म्हात्रे यांचेही लक्ष वेधण्यात आले; मात्र श्री. म्हात्रे यांनी ही चिन्हे आणि आकार हा निवडणूक आयोगाने ठरवलेला आहे. त्यामध्ये आम्ही काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. मतदान यंत्रावरील मत पत्रिकेच्या बॅलेट पेपरचा रंग पिवळा, गुलाबी असल्यास ही चिन्हे ठळक दिसून येतात; मात्र बॅलेट पेपरचा रंग हा पांढरा असल्याने काही प्रमाणात ते ठळक दिसून येत नाही, असे सांगितले. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावर चर्चा झाली; मात्र यावर तोडगा नसल्याने इन्सुली ग्रामपंचायत वगळता सर्वांनी ईव्हीएम मशीन सील करण्यास सहमती दर्शवली. 

इन्सुलीतील उमेदवारांची हरकत 
इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन सील करण्यासाठी आवश्‍यक असलेली सही करण्यास सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून नकार देण्यात आला. चिन्ह स्पष्ट दिसत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले; मात्र तहसीलदारांकडूनही ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्याचे नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EVM machine issue sawantwadi konkan sindhudurg