नाराज माजी आमदार दळवींची मनधरणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

दाभोळ - शिवसेनेत नाराज असलेले दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई करीत आहेत. अद्यापही दळवी यांनी देसाईंना दाद लागू न दिल्याने दळवींची पुढील भूमिका काय असेल, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. 

दाभोळ - शिवसेनेत नाराज असलेले दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई करीत आहेत. अद्यापही दळवी यांनी देसाईंना दाद लागू न दिल्याने दळवींची पुढील भूमिका काय असेल, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. 

सूर्यकांत दळवी हे शिवसेनेच्या तिकिटावर दापोली विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. आपल्या पराभवाला शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम हे जबाबदार असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.

गेल्या ४ वर्षात दळवी व रामदास कदम यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. याचाच फटका शिवसेनेला दापोली व मंडणगड तालुक्‍यामध्ये काही प्रमाणात बसला आहे. दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचे पूर्ण बहुमत आले नाही तर २० वर्षे शिवसेनेची सत्ता असलेली पंचायत समितीही हातून गेली. मंडणगडमध्ये एकच नगरसेवक निवडून आला तोही नशिबाच्या जोरावर. मंडणगड पंचायत समिती काठावर टिकवण्यात सेना यशस्वी झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दळवींच्या नाराजीचा फटका बसला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील असून २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही त्यावेळचे शिवसेनेचे अनंत गीते हे कसेबसे विजयी झाले होते. यावेळी गीतेंसमोर काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे कडवे आव्हान आहे.

भगवा फडकवण्यासाठी धडपड
शिवसेनेला रायगडावर भगवा फडकवण्यासाठी एक एक मत महत्त्वाचे असून याच दृष्टीने माजी आमदार सूर्यकांत दळवी व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील वाद मिटावा,यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रयत्नशील आहेत. दळवींना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येईल,असे गाजरही देसाईंनी दळवींना दाखविले असले तरी अशा आमिषाना आपण बळी पडणार नसल्याचे दळवींचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA Suryakant Dalavi angry on Shivsena