कांदळगाव सोसायटीच्या माजी अध्यक्षांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

कोळंब येथील पपन मेथर हे सर्जेकोट येथील श्री देव खापरेश्‍वर, कांदळगाव श्री देव रामेश्‍वराचे मानकरी होते. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच 11 ला दुपारी ते घरातून पिशवी घेऊन बाहेर पडले होते.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - कोळंब येथील रहिवासी, कांदळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष, खापरेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त हेमकांत ऊर्फ पपन यशवंत मेथर (वय 56) यांनी रेवंडी गोठण येथील दोन वड येथे गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच कोळंबसह, तालुक्‍यात मित्रपरिवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

कोळंब येथील पपन मेथर हे सर्जेकोट येथील श्री देव खापरेश्‍वर, कांदळगाव श्री देव रामेश्‍वराचे मानकरी होते. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच 11 ला दुपारी ते घरातून पिशवी घेऊन बाहेर पडले होते. ते सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली; मात्र ते सापडून आले नाहीत. आज सायंकाळी रेवंडी गोठण दोन वड येथे गेलेल्या स्थानिक ग्रामस्थांना एका व्यक्तीने वडाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती कोळंबमधील स्थानिकांना देताच त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, संतोष गलोले, प्रसाद आचरेकर, विवेक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मेथर यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची पाहणी केली असता पपन मेथर यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा - निवडणूकीत उमेदवारी मागे घ्यायला लागली या रागातून खून 

कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, संदीप भोजने, ग्रामपंचायत सदस्य गणेश आचरेकर, प्रियल लोके, विनायक धुरी, भास्कर कवटकर, राजू हडकर, अनिल न्हिवेकर, उमेश मांजरेकर, सौगंधराज बादेकर यांच्यासह मेथर यांच्या मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मेथर यांच्या आत्महत्येचा त्यांचा मित्र परिवारास मोठा धक्का बसला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मेथर यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.  

हेही वाचा - मंत्रीपदासाठीच हे आमदार करताहेत राणेंवर टिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex President Papan Methar Of Kandalgaon Society Suicide