आता शेतकऱ्यांची वसुली थांबवणार

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 11 November 2020

जिल्ह्यातील कृषी सेवकांनी त्या-त्या गावांत जाऊन कोणते पीक घेता येईल, याचा सर्व्हे केला पाहिजे.

रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत लाभ घेतलेल्या काही कर दाते शेतकऱ्यांकडून जिल्हाप्रशासन बिनधास्त वसुली करत आहे. ती थांबवण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा - बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा समजली -

रत्नागिरीत बोलताना आमदार लाड म्हणाले, किसान सन्मानचा लाभ घेतलेल्यांमध्ये काही शेतकरी करदाते तर काही विविध कारणांनी अपात्र ठरलेले आहेत. त्या शेतकऱ्यांकडून दादागिरी करत वसुली होत आहे. ही बाब गंभीर असून आजच्या स्थितीत शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे वसुली करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांची दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही. हा मुद्दा लक्षात आणल्यानंतर वसुली स्थगित करू, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

परजिल्ह्यातून रत्नागिरीत मोठ्याप्रमाणात भाजी येते. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली तर घरातच रोजगार मिळू शकेल. यासाठी भाजप लक्ष घालेल. जिल्ह्यातील कृषी सेवकांनी त्या-त्या गावांत जाऊन कोणते पीक घेता येईल, याचा सर्व्हे केला पाहिजे. त्याचा अहवाल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही झाली पाहिजे.

सर्व्हेसाठी १५ दिवसाचा कालावधी 

भाजीपाला लागवडीला चालना दिली तर रत्नागिरीतील युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवणे शक्‍य आहे. या सर्व्हेसाठी १५ दिवसाचा कालावधी प्रशासनाला दिला आहे.

हेही वाचा -  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल -

मंत्र्यांना रवी चव्हाणांचा सल्ला

राजकारण खुलेआम करावे. ते निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आत्मसात केले पाहिजे. मात्र, रत्नागिरीत तशी परिस्थिती नाही. स्थानिक मंत्री चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यातून सामान्यांना फटका बसतो. पदावर विराजमान होताच, तिथे राजकीय दृिष्टकोन वापरु नये, असा सल्ला माजी मंत्री भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी चव्हाण यांनी स्थानिक मंत्री उदय सामंत यांना दिला.
 

संपादन - स्नेहल कदम