नेतर्डे येथील जमिनीत बेकायदा गौण खनिज उत्खनन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नेतर्डे येथील तब्बल 800 एकर जमिनीत बेकायदा गौण खनिज उत्खनन झाले आहे. त्यात सुमारे अडीच कोटीचा गैरव्यवहार झाला आहे.

सावंतवाडी - 'नेतर्डे येथील तब्बल 800 एकर जमिनीत बेकायदा गौण खनिज उत्खनन झाले आहे. त्यात सुमारे अडीच कोटीचा गैरव्यवहार झाला आहे. यामागे महसूल यंत्रणा असून गोव्यातील व्यावसायिकांत सोबत खुद्द तहसीलदारानी 'सेटिंग' केले आहे. तसे माझ्याकडे पुरावे आहेत,' असा आरोप ग्रामस्थ जगदेव गवस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान या प्रकरणात जबाबदार असलेल्या संबंधितांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी आपण उद्या ता. 4 ला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
श्री गवस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, नेतर्डे परिसरात आमची सामाईक जमीन आहे. मात्र साक्षीदारांना विश्वासात न घेता गोव्यातील काही उद्योजकांकडून त्याठिकाणी गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत आपण आंदोलन केले होते उपोषण केले होते. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उत्खनन झाले नाही. त्यामुळे रॉयल्टी भरली गेली नाही असे सांगून या प्रकाराकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारांमध्ये सावंतवाडीचे तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांचे साटेलोटे आहेत. तर दुसरीकडे हा प्रकार बाहेर येऊ नये म्हणून चौकशी करण्याच्या उद्देशाने त्या गौण खाणीकडे बोलून मला संपविण्याचा डाव होता, असा आरोप गवस यांनी केला आहे. दरम्यान या संबंधितांची खात्याने चौकशी व्हावी, या मागणीसाठी आपण उद्या बेमुदत उपोषण करणार आहे. काही झाले तरी माघार घेणार नाही असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडीच्या तहसीलदार सतीश कदम यांनी सहा मुले असलेल्या एका वृद्धेला अंत्योदय योजनेचा लाभ दिला होता. त्यातील चार मुलगी शासकीय नोकरीला आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी हा लाभ रद्द केला व संबंधित महिलेने स्वतःहून योजना नाकारली असे आपल्याला पत्र दिले आहे. त्यामुळे अशा प्रकारची नेमकी किती लोकांना चुकीचे लाभ दिले. याची चौकशी व्हावी अशी मागणी गवस यांनी केली आहे.

याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी तहसीलदार सतीश कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गवस यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत आम्ही त्यांना संपवण्यासाठी कट रचला हे आरोप हास्यास्पद आहे. त्याठिकाणी पंचनामा करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी व श्री गवसेना उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र त्या ठिकाणी येणार नाही, असे सांगून गवस यांनी येण्यास नकार दिला त्यांच्या म्हणण्यानुसार चुकीचे उत्खनन झाल्यास त्याची चौकशी सुरू आहे. खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Excavation of illegal mineral mining in Netard savanwadi