रो-रो सेवेचा गुजरातपर्यंत विस्तार - कोकण रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

कणकवली - कोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर गुजरातपर्यंत धावली आहे. मुंबईतील पश्‍चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे कोकण रेल्वेचेच्या रो-रो सेवेचा देशपातळीवर विस्तार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कणकवली - कोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर गुजरातपर्यंत धावली आहे. मुंबईतील पश्‍चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे कोकण रेल्वेचेच्या रो-रो सेवेचा देशपातळीवर विस्तार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने रो-रो 2001 पासून रो-रो सेवा सुरू केली आहे. यात रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या वॅगनमधूनच मालवाहतूक ट्रक आणि कंटेनर्सची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली अठरा वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड (रायगड) ते सुरतकल (कर्नाटक) या स्थानकांपर्यंत ही सेवा सुरू आहे.

कोकण रेल्वेची रो-रो सेवा इतर मार्गावर चालविण्याबाबतची शक्‍यता तपासण्यासाठी पश्‍चिम रेल्वेच्यावतीने 20 सप्टेंबरला सुरतकल ते करंबेळी (गुजरात) या दरम्यान 25 ट्रकची वाहतूक करण्यात आली. या ट्रकमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक ग्रेन्यल्स, सुपारी, रोस्टेड काजू आदी सामग्रीचा समावेश होता. हे सर्व ट्रक करंबेळी येथील रेल्वेच्या गुडस्‌ शेडमध्ये उतरविण्यात आले.

दरम्यान गतवर्षी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुरतकल ते करंबेळी स्थानकापर्यंत रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील काळात देशपातळीवर रो-रो सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

माल वाहतुकीची रो-रो सेवा पश्‍चिम रेल्वे मार्गावर देखील सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वे पाठवला होता. त्यानंतर गुरूवारी (ता. 20) सुरतकल ते करंबेळी दरम्यान रो-रो चाचणी घेण्यात आली. ही एक प्रकारे अनोखी आणि पर्यावरणपूरक सेवा आहे. भविष्यात माल वाहतूक क्षेत्रात रो-रो सेवेची प्रमुख भूमिका असणार आहे.
- रवींद्र भास्कर,
जनसंपर्क अधिकारी पश्‍चिम रेल्वे.

पेण ते बोईसर रो-रोची शक्‍यता
नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर रोड, भिवंडी, वसई या भागांतील महामार्गावरील अवजड मालाच्या वाहतुकीमुळे सतत कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी उरण येथील जेएनपीटी येथून भिवंडी, बोईसर या भागांमध्ये होणाऱ्या मालवाहतुकीसाठी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवा प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने गतवर्षी पेण ते बोईसर अशी रो-रो सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

Web Title: Expansion of RO-RO service to Gujarat