संगमेश्वर तालुक्यात माखजन येथे रुग्णांना मुदत संपलेले सलाईन

संदेश सप्रे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

संगमेश्वर - रुग्णांना मुदत संपलेले सलाईन लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबतची लेखी तक्रार माखजन ग्रामपंचायत सदस्य महेश बाष्टे यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.

माखजनमध्ये घडलेल्या या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने माखजनसह संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. महेश बाष्टे यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माखजन पंचक्रोशीतील रुग्णांना मुदत संपलेली सलाईन लावली जात आहेत, अशी माहिती आपल्याला रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली होती.

याबाबतची खात्री करण्यासाठी आपण स्वतः माखजन आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली, तेव्हा एका महिला रुग्णाला मुदत संपलेले सलाईन लावले असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. मुदत छापलेल्या ठिकाणी काळ्या रंगाच्या मार्करने खोडलेले होते. मात्र तरीदेखील मुदत संपलेली तारीख दिसून येत होती. याचे छायाचित्र घेतले. व्हिडिओही चित्रित केला. या गंभीर प्रकाराचे हे पुरावे वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केले आहेत. ही घटना समजल्यानंतर माखजनच्या सरपंच दीपा खातू, उपसरपंच समीर लोटणकर, रूपेश गोताड, प्रभाकर गोटेकर, विशाल रांजणे यांनी माखजन रुग्णालयाला भेट दिली. याबाबत वैद्यकीय अधिकारी धनंजय महाडिक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे या सार्‍यांनी सांगितले.

Web Title: Expired saline given to Patient in Sangameshwar Taluka