आपली कृत्ये लपवण्यासाठीच राणेंकडून जठारांवर बेताल आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

देवगड - देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार नीतेश राणे यांनी भाजप कार्यालयासमोर घातलेला धिंगाणा सर्वच देवगडवासीयांना ज्ञात झाला आहे. हे काळे कृत्य लपवण्यासाठीच ते प्रमोद जठार यांच्यावर बेताल आरोप करीत असल्याचे माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

देवगड - देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार नीतेश राणे यांनी भाजप कार्यालयासमोर घातलेला धिंगाणा सर्वच देवगडवासीयांना ज्ञात झाला आहे. हे काळे कृत्य लपवण्यासाठीच ते प्रमोद जठार यांच्यावर बेताल आरोप करीत असल्याचे माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भाजपच्या विजयी उमेदवारांची सर्वांनी मिळून विजयी मिरवणूक काढली. अपयशाने खचून जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, नीतेश राणेंनी भाजप कार्यालयासमोर घातलेल्या धिंगाण्याचा देवगड जामसंडेच नव्हे तर संपूर्ण तालुक्‍यातील जनतेतून निषेध केला जात आहे. त्यामुळे येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देवगडची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक जठार यांनी काढली नसून आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काढली होती. त्यावेळी प्रमोद जठार देवगडमध्ये उपस्थितही नव्हते. त्यामुळे दुसऱ्यांवर बेताल आरोप करण्याची सवय राणेंना आहे. खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणे हे त्यांचे कामच आहे. राणे यांनी अंडीफेकीच्या निंदनीय कृत्यानंतर ही अंडी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारली नसून ती देवगड जामसंडेच्या जनतेने मारल्याचे म्हटले आहे. हा देवगड जामसंडेवासीयांचा अपमान आहे. जनतेवर विश्‍वास आहे; मात्र स्वतः अडचणीत येणार हे माहीत झाल्यानेच आमदार राणे अशाप्रकारे पलटी मारत असल्याचा टोलाही गोगटे यांनी लगावला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, भाजप हा पराभवाने खचून जाणाऱ्यांचा पक्ष नाही. कारण एकवेळ लोकसभेमध्ये भाजपचे फक्‍त दोनच खासदार होते. तेव्हापासून अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन पक्षाचे काम केले. त्यामुळेच आज देशात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. याउलट कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. अशा या बुडत्या नावेमध्ये बसून नीतेश राणे विकासाची स्वप्न बघत आहेत हे हास्यास्पदच आहे. राणेंना जनतेच्या विकासाशी काहीच देण घेणं नाही. त्यांना फक्‍त राजकीय स्वार्थ साधायचा आहे. निवडणुकीपुरती जनतेला प्रलोभने दाखवायची आणि नंतर ती सोयीस्करपणे विसरायची हा त्यांचा इतिहास देवगडवासीयांना विधानसभा निवडणुकीनंतर चांगलाच कळला आहे. त्यामुळे असा राडा यापुढे येथील जनता कधीच खपवून घेणार नाही.

Web Title: Extravagant allegations of Rane