भाजप पक्षविरोधी काम करणाऱ्या चाैघांची सिंधुदुर्गात हकालपट्टी

BJP
BJP

कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. 

भाजप जिल्हाध्यक्ष जठार यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""कणकवली मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर आमदार नीतेश राणे निवडणूक लढवत आहेत; मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी संदेश पारकर, अतुल रावराणे, लक्ष्मण रावराणे आणि संदेश सावंत-पटेल हे काम करत आहेत. त्यांच्या या शिस्तभंगाबद्दल त्यांना समजदेखील देण्यात आली होती. वरिष्ठ पातळीवर अहवाल देखील पाठविण्यात आला होता.'' 

ते म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांचा कणकवली काल (ता.15) दौरा झाला. यावेळी संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण संघटनमंत्री सतीश धोंड यांनी कणकवलीत येऊन या चौघांची हकालपट्टी करण्याचे आपणास निर्देश दिले होते. हकालपट्टीची कारवाई करण्यापूर्वी या चौघांनाही जिल्ह्याचे संपर्कमंत्री चव्हाण यांनी चर्चा करण्यासाठी कणकवलीत बोलावले होते. यात संदेश पारकर उपस्थित राहिले; मात्र इतर मंडळी आली नाहीत. पारकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला; परंतु पारकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे या दोघांचीही भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागला.''

ते म्हणाले, ""पारकर आणि रावराणे यांच्याकडे मुळातच कुठलेही पद नव्हते; मात्र भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात आल्याने त्यांना नेतेपदाचा मान मिळाला होता. हे दोघेही बिनपदाचे फुल्ल अधिकारी होते; मात्र आता त्यांच्याकडे नेतेपद राहिलेले नाही.'' 

सावंतांच्या प्रतिष्ठेसाठी विकासाचा बळी 
कणकवलीतून विधानसभेत जाणारे नीतेश राणे हे निश्‍चितपणे कॅबिनेटमंत्री होतील. उद्याचे ते पालकमंत्रीही असणार आहेत. या उलट शिवसेनेकडून सतीश सावंत निवडून आले, तर ते आमदारच राहणार आहेत. याशिवाय शिवसेना पक्ष हा विरोधी पक्षात असल्यासारखाच आहे. सिंधुदुर्गात विकासाचीही कामे मार्गी लागणार नाहीत. त्यामुळे सतीश सावंतांच्या प्रतिष्ठेसाठी सिंधुदुर्ग विकासाचा बळी दिला जातोय. यात पारकर, रावराणे खतपाणी घालत असल्यानेच त्यांची हकालपट्टी करावी लागली, असे श्री. जठार म्हणाले. 

केसरकरांना तेली धक्‍का देणार 
शिवसेनेने कणकवलीत आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपची युती नाही. कुडाळमध्ये रणजित देसाई आणि सावंतवाडीत राजन तेली हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. यात राजन तेली हे पालकमंत्री दीपक केसरकर यांना धक्‍का देण्यात निश्‍चितपणे यशस्वी होतील, असा विश्‍वास प्रमोद जठार यांनी व्यक्‍त केला. 

सदा ओगले भाजपचे निष्ठावंत 
विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने सदा ओगले निश्‍चितपणे नाराज होते; परंतु भाजप कार्यकत्यांनीच त्यांची समजूत काढली. मुख्यमंत्र्यांशी बोलून ओगलेंना पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू; पण पक्ष सोडणे चुकीचे आहे, अशी भूमिका देवगडातील कार्यकर्त्यांनी घेतली. ओगले हे आता भाजप उमेदवाराच्या प्रचारात आहेत. ते नाराजही नाहीत, असेही श्री.जठार म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com