तरुणाच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत देवरूखकर कुटुंबीयांकडून नेत्रदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

चिपळूण - खेड तालुक्‍यातील रघुवीर घाटातील धबधब्याजवळ पडून मृत्यू झालेल्या येथील प्राजक्त रविकिरण देवरूखकर (वय २७, लोटे ) याच्या कुटुंबीयांनी दुःख बाजूला ठेवून नेत्रदान करून आदर्श निर्माण केला. शुक्रवारी (ता. १३) अपघात झाला होता. 

चिपळूण - खेड तालुक्‍यातील रघुवीर घाटातील धबधब्याजवळ पडून मृत्यू झालेल्या येथील प्राजक्त रविकिरण देवरूखकर (वय २७, लोटे ) याच्या कुटुंबीयांनी दुःख बाजूला ठेवून नेत्रदान करून आदर्श निर्माण केला. शुक्रवारी (ता. १३) अपघात झाला होता. 

प्राजक्त देवरूखकर हा रघुवीर घाटात फिरायला गेला असता धबधब्याजवळ पडून त्याच्या डोक्‍याला जबर मार लागला. उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. लहान भावाच्या मृत्यूच्या दुःखात असूनही त्याचा भाऊ रणजित देवरूखकरने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. रात्री ११ वाजता सह्याद्री निसर्ग मित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, भाऊ काटदरे यांनी लोटे येथील घरडा रुग्णालयात जाऊन प्राजक्तचा नेत्र (कॉर्निया) १५ ते २० मिनिटात काढला. खास एम. के. मीडियम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्‍समधून नेत्र सांगली येथील दृष्टिदान आय बॅंकेकडे पाठविण्यात आला.

वर्षभरात अकरा नेत्रदान
गेल्या वर्षभरात ११ यशस्वी नेत्रदान झाली आहेत. जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी ७ लाख ८० हजार अंधबांधव भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोतिबिंदूमुळे, तर २ टक्के कॉर्निया खराब होण्यामुळे आहे. यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत आहे. या दीड लाख अंधांना नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला, तर त्याच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो.

Web Title: Eye donation from Devrukhkar family members