संपलो जरी मी; अजून नजरेत जगतो मी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

रायगड जिल्ह्यात मरणोत्तर नेत्रदानातून १९५ जणांना दृष्टी

अलिबाग - ‘‘संपलो जरी मी, तरी कुणाच्या नजरेत अजून जगतो मी’’ ही उदात्त मानवी भावना प्रत्यक्षात आणण्याचा एकमेव शाश्‍वत मार्ग म्हणजे मरणोत्तर नेत्रदान! मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची ही आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे मागील पावणेतीन वर्षांत जिल्ह्यातील १९५ दृष्टिहीनांना या सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले. जिल्ह्यातील दोन हजार दृष्टिहीन अद्यापही अशा देवदुतासम दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. 

माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासांत काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो. हे जग पुन्हा पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्‍यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्‍यक असते.

नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या ‘कॉनिर्या’ या भागाचे रोपण केले जाते. 

रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. पावणेतीन वर्षांत जिल्ह्यात ४७१ नेत्रपटल जमा झाले. यामधून १९५ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली. आजघडीला जिल्ह्यातील ८०० नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात दोन हजार दृष्टिहीन व्यक्ती आहेत.

हे लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६३८४९१४३.

नेत्रदानाचा संकल्प घरच्यांना सांगाच 
रायगड जिल्ह्यात मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती होत आहे. वर्षाला ३०० नागरिक नेत्रदानाचा संकल्प करतात; मात्र यामधील काही आपल्या संकल्पाची माहिती घरातील इतरांना देत नाहीत. त्यामुळे अशा एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या संकल्पाची माहिती कुटुंबीयांना नसल्याने ते रुग्णालयाशी संपर्क साधत नाहीत. त्यामुळे अशा नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प केला असतानाही, त्याची नेत्रपटले काढली जात नाहीत. 

जिल्हा रुग्णालयाचे प्रयत्न 
जिल्हा रुग्णालयाद्वारे नेत्रदानाविषयी जनजागृती घडण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. नेत्रदान सप्ताह घेण्यात येतो. भित्तीपत्रके, मार्गदर्शन शिबिर, पथनाट्यांतून जनजागृती करण्यात येते. यात काही सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्षाकाठी सुमारे एक हजार जण नेत्रदानाचा संकल्प करतात. 

दृष्टिक्षेपात रायगड 
वर्ष -     जमा नेत्रपटल     दृष्टी मिळालेले     

२०१४-१५      १८२         ९८
२०१५-१६     १७६          ५७
१ एप्रिल ते नोव्हेंबर २०१६      ११३              ४०

Web Title: eye donation publicity