फेसबुक प्रकरणातून एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

या प्रकारामुळे पालीसह चांदेराईत तणावपूर्ण वातावरण होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुमार अशोक शिंदे (वय 37), महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे, पंचायत समिती सदस्य महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर (सर्व रा. उमरे-चांदेराई) यांचा समावेश आहे.

रत्नागिरी - "फेसबुक'वरून मुलीला मेसेज केल्याच्या प्रकारातून काल (ता. 10) उमरे-चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे पाली येथील संबंधित मुलाच्या नातेवाइकांना बेदम मारहाण झाली. त्यात मुलाचे चुलते दयानंद चंद्रकांत चौगुले (वय 46, रा. नवीन वसाहत- साठरेबांबर, पालीजवळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. त्यात शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा समावेश आहे. त्या सर्वांना न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकारामुळे पालीसह चांदेराईत तणावपूर्ण वातावरण होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुमार अशोक शिंदे (वय 37), महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे, पंचायत समिती सदस्य महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर (सर्व रा. उमरे-चांदेराई) यांचा समावेश आहे.

ही घटना शुक्रवार (ता. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उमरे-चांदेराई येथे संशयितांच्या घरी घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी ः रामचंद्र चंद्रकांत चौगुले यांचा मुलगा चिन्मय याने एका मुलीस फेसबुकवरून मेसेज केले होते. मेसेजची माहिती तिने आपल्या आई-वडिलांना दिली होती. चिन्मयच्या घरी हा प्रकार समजला. त्याचे चुलते दयानंद चौगुले यांनी तडजोडीची भूमिका घेतली.

पोलिस ठाण्यात तक्रार करू नका, आम्ही भेटण्यासाठी येतो, असा निरोप त्यांनी चांदेराई गावात दिला. काल (ता. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दयानंद चौगुले आणि त्यांचे सहकारी चांदेराईत गेले. एका घरामध्ये चर्चा सुरू झाली. तेथे गाव जमा झाला होता. चर्चेचे रूपांतर वादावादीत झाले. पाच संशयितांनी दयानंद आणि अन्य लोकांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यास सुरवात केली. दयानंद यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्‍यांनी मारले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर दयानंद यांना चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Facebook is one of the murder case