वणवा रोखण्यात अपयश!

- प्रणय पाटील
गुरुवार, 5 जानेवारी 2017

रायगड जिल्ह्यात वन विभागाला वणवे रोखण्यात अपयश आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ६१३ हेक्‍टरला वणव्याची झळ बसली...

रायगड जिल्ह्यात वन विभागाला वणवे रोखण्यात अपयश आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ६१३ हेक्‍टरला वणव्याची झळ बसली...

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील जंगलांमध्ये वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित आहेत. या वणव्यांमुळे सुमारे दीड लाख हेक्‍टरवरील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगलातील प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. २०१६ मध्ये (एप्रिल ते डिसेंबर) जिल्ह्यात ९६ ठिकाणी वणवे लागले असून ६१३ हेक्‍टर क्षेत्राला त्याची झळ बसली आहे.
रायगड जिल्ह्याला सुमारे दीड लाख हेक्‍टर जंगल क्षेत्र लाभले आहे. यामध्ये हजारो प्रकारची झाडे व शेकडो प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्य करीत आहेत. वणव्यांमुळे वनसंपदा धोक्‍यात येत आहे. जंगलात गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबड्या, मोर, सापांच्या प्रजाती, गवतावरील कीटक, भेकरे यांसारख्या पशु-पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे. जिल्ह्यातील १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत.

जंगलांचे वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून जंगलक्षेत्रावर लक्ष ठेवण्यात येते. वणवे लागल्यानंतर ते लागलीच आटोक्‍यात आणण्यासाठी वणवेरोधक बेल्ट तयार केले जातात. अनेक ठिकाणी स्थानिकांची मदत घेतली जाते. मात्र एवढे सर्व उपाय करूनही वणवे रोखण्यात वन विभागाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

वणव्यामुळे जीवित व आर्थिक हानी
जंगलातील अनियंत्रित वणवे शेजारील गावात शिरतात. डोंगरातील आदिवासी वाड्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. गेल्या काही दिवसांतील अनियंत्रित वणव्यांनी महाड, पोलादपूर, पेण, अलिबाग तालुक्‍यांतील काही आदिवासी वाड्यांना वणव्यांची झळ बसली. चिंबरान आदिवासी वाडीतील १३ घरे वणव्याच्या आगीत भस्मसात झाली. यामध्ये खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. महाडमधील वरंध घाट परिसरात लागलेल्या वणव्याच्या आगीत होरपळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही घटना जिल्ह्यात घडली होती. 

वणवे का पेटवले जातात?
हिवाळ्याच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोकणातील जंगलांत वणवे लावले जातात. याला स्थानिकांमधील गैरसमज कारणीभूत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत चांगले यावे व सरपणाला (जाळण्यासाठी) लाकूड मिळावे, म्हणून वणवे पेटवतात. याबरोबर रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठीही वणवे लावले जातात. एकदा वणवा पेटला की वन्य प्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरुवात करतात. त्यामुळे या वन्यजीवांची शिकार करणे सहज शक्‍य होते.

वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. वनांचे महत्त्व व वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागणार आहे. यासाठी निसर्गरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांची मदत घेणे आवश्‍यक आहे. याबरोबर गावपातळीवर वनसंरक्षण संस्था स्थापन करून निधी देणे, पावसाळा संपल्यावर व वणवेरोधक बेल्ट तयार करणे, जंगलांच्या सुरुवातीला घायपात व रबर यांसारख्या आगरोधक झाडांची लागवड करणे गरजेचे आहे.
- प्रा. एल. एस. पाटील, सचिव, रिसर्च सेंटर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट.

वणवे रोखण्यासाठी जंगलांमध्ये वणवेरोधक बेल्ट तयार करण्याचे काम करण्यात येते. तसेच पथनाट्य, भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येते. जंगलांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एखाद्या ठिकाणी वणवा लागल्याची घटना घडताच स्थानिकांच्या मदतीने व वन विभागातर्फे ती आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
- एन. डी. वाणी, कार्यालय अधीक्षक, वनविभाग; अलिबाग.

वर्ष -     वणव्यांची संख्या - वणव्यांची झळ     पोहोचलेले क्षेत्र 
                                                             (हेक्‍टरमध्ये)

२०१४-१५ -                      ७९ -                       ५८५. ८३३
२०१५-१६ -                      १८६ -                     १०३५.४९०
२०१६-१७ (डिसें.पर्यंत) -     ९६ -                        ६१३.५५३ 

Web Title: Failure to prevent forest fires!