"ते' स्टिंग ऑपरेशन खोटे 

False Sting Operation In Malvan Corporation
False Sting Operation In Malvan Corporation

मालवण ( सिंधुदुर्ग ) - स्टिंग ऑपरेशनद्वारे विरोधी नगरसेवकांनी जी व्हिडीओ क्‍लिप व ऑडीओचे सादरीकरण केले त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बदल करण्यात आला आहे. पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम व लेखाविभाग आहे. याठिकाणी आमच्याच कारकिर्दीत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही असतानाही या विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे.

विरोधकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्यांच्याकडून हे खोटे आरोप केले जात आहेत. जनतेने ज्या विश्‍वासाने आपल्याला निवडून दिले त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. ज्यादिवशी माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होईल त्यादिवशी एक क्षणही त्या पदावर राहणार नाही, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. 

तक्रार जबरदस्तीने घेतली लिहून

रॉयल इक्विपमेंट कंपनीचे राकेश साहल यांच्याकडून यांनीच जबरदस्ती तक्रार लिहून घेतली होती आणि हे तथाकथित घडवून आणले. त्यामुळे साहल यांनीच आपण कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. याबाबत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या विरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचा ई-मेलही पाठविला असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी स्पष्ट करत त्याची प्रत सादर केली. भाजपचे गटनेते गणेश कुशे व सुदेश आचरेकर यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे बांधकाम विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केल्याचा दावा करत नगराध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

नगराध्यक्ष कांदळगावकर म्हणाले....

यासंदर्भात नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ""आपण पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती ही असल्याच राजकारणाला कंटाळून घेतली होती; मात्र पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत येथील जनतेने मला निवडून दिले. गेली तीन वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहे. आतापर्यत कोट्यवधी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. असे असतानाच आत्ताच माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. याची सुरवात विधानसभा निवडणुकीपासून झाली. सुदेश आचरेकरांचे खंदे समर्थक नरेश हुले यांचा मी शिवसेनेत प्रवेश घेतला. याचे शल्य त्यांना बोचत होते. त्यानंतर स्वाभीमान तालुकाध्यक्ष मंदार केणी, यतीन खोत, शीला गिरकर, भाई कासवकर ही त्यांच्या गटातील माणसे शिवसेनेत दाखल झाली. याचा एकत्रित परिणाम म्हणून विधानसभेत तेराशेचे मताधिक्‍य शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे शहरातील प्राबल्य वाढत असल्याने त्यांना आपला भविष्यात पराभव दिसू लागला. त्यामुळेच ते आरोप करत आहेत. त्यांनी तथाकथित खोटी एडिट केलेली, तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेली क्‍लिप जनतेसमोर आणली आहे. याबाबत त्यांनी तक्रार केल्याचे म्हटले आहे त्यामुळे ज्यावेळी चौकशी होईल त्यावेळी त्यातील सत्य आम्ही सांगू.'' 

वैफल्यग्रस्त होऊन खोटे आरोप

ते म्हणाले, ""बांधकाम, लेखाविभागात सीसीटीव्ही असून तेथे अनेक वर्षे कर्मचारी काम पाहत आहेत. विरोधकांच्या म्हणण्यानुसार जर तेथे आर्थिक गैरव्यवहार झाला असे सांगितले जात असेल तर ते चुकीचे आहे. जर गैरव्यवहार झाला असता तर संबंधित ठेकेदार अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हात मिळवत आनंदाने बाहेर पडला नसता तर तडक निघून गेला असता. त्यामुळे ती ऑडीओ व व्हिडीओ क्‍लिप यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आचरेकर हे बरीच वर्षे पालिकेत आहेत. त्यांची रोजीरोटी पालिकेवरच सुरू आहे. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांनी आपले व्यवसाय जाहीर करावेत. कुठून उत्पन्न मिळते जाहीर करावे. मुंबईसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट कसे याचे उत्तर जनतेला द्यावे. उत्पन्नाची साधने बंद झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन खोटे आरोप करत आहेत. पालिकेतील मागील व यावेळची निविदा पाहता कमी दराच्या निविदा येत आहेत त्यामुळे याचे शल्य जे नेहमी कॅल्क्‍युलेटर घेऊन बसतात त्या विरोधकांना आहे. ज्या ठेकेदाराने तक्रार दिली असे ते म्हणतात त्या ठेकेदाराची निविदा नामंजूर करण्यासाठी ह्याच व्यक्ती मागे लागल्या होत्या; मात्र कमी दराची निविदा आम्ही मंजूर केली. 20 लाखाची निविदा 12 लाखाला मंजूर करून पालिकेचे आठ लाख रुपये वाचविले. जर आम्हाला गैरव्यवहार करायचे होते तर कमी दराच्या निविदा मंजूर केल्या नसत्या. सर्वबाजूंनी त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. बिल्डर लॉबीलाही ते त्रास देत असून त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार दिली आहे. आचरेकर हे निवडून आल्यापासूनच राजीनाम्याची मागणी करत आहेत. यात आता त्यांच्यासोबत गणेश कुशेंची भर पडली आहे. त्यामुळे या दोघांनी ठरवावे की नगराध्यक्षाची निवडणूक नक्की कोण लढविणार.'' 

विरोधी नगरसेवकांकडून खोटे आरोप 

यावेळी नगराध्यक्षांचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे. एटीएम बंद झाल्याने वैफल्यग्रस्त झाल्यानेच या विरोधी नगरसेवकांकडून खोटे आरोप केले जात आहेत; मात्र शिवसेना नगराध्यक्षांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे. आपल्याच भल्याचे विचार करणारे हे नगरसेवक सध्या अल्पमतात आहेत. गणेश कुशे यांनी आपले सभासदत्व टिकवावे, असे मंदार केणी यांनी सांगितले. यावेळी हरी खोबरेकर, बबन शिंदे, नितीन वाळके यांनीही यावेळी विरोधकांवर गंभीर आरोप केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com