esakal | अभिनेते अमिर खान कुटुंबासह सिंधुदुर्गात

बोलून बातमी शोधा

Famous actor Aamir Khan with family come Sindhudurg district}

येथील पोलिस परेड मैदानावर सकाळपासून दोन हेलीपॅड तयार करण्यात आली होती; मात्र कोण येणार हे समजत नव्हते. जिल्ह्यात मंत्री येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास एकापाठोपाठ एक अशी दोन हेलिकॉप्टर पोलिस परेड मैदानावर उतरली.

अभिनेते अमिर खान कुटुंबासह सिंधुदुर्गात
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्रसिद्ध अभिनेते आमिर खान आज जिल्ह्यात अचानक दाखल झाले. ते, सहकुटुंब सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर दोन हेलिकॉप्टरने आले. येथून ते बंदोबस्तात कुडाळच्या दिशेने वाहनाने गेल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासमवेत पत्नी व मुलगी असून जिल्ह्यात चित्रीकरणासाठी आले असल्याचेही चर्चा आहे. ते, भोगवे येथे काही दिवस वास्तव्य करणार असल्याचेही समजते; मात्र याबाबत सुरक्षा यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. 

येथील पोलिस परेड मैदानावर सकाळपासून दोन हेलीपॅड तयार करण्यात आली होती; मात्र कोण येणार हे समजत नव्हते. जिल्ह्यात मंत्री येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास एकापाठोपाठ एक अशी दोन हेलिकॉप्टर पोलिस परेड मैदानावर उतरली. यातील एका हेलिकॉप्टरमधून अभिनेता आमिर खान उतरल्याचे तेथील उपस्थितांनी पाहिल्यावर याबाबतची माहिती सर्वत्र पसरली. दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून त्यांची पत्नी व मुलगी उतरली. यावेळी कडक बंदोबस्त होता. पोलिस सुरक्षेसह खासगी सुरक्षाही होती. यानंतर एका वाहनाने खान कुटुंबिय कुडाळच्या दिशेने निघून गेले. 

पोलिस अधीक्षकांची घेतली भेट 
हेलीकॉप्टरमधून उतरल्यानंतर आमिर खानने कुटुंबियांसोबत जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. तेथे थोडावेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी कुडाळच्या दिशेने मार्गक्रमण केले. यावेळी ते दाभाडे यांना का भेटले, नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही. 

दौऱ्याचे कारण गुलदस्त्यात 
आमिर निघून गेल्यानंतर पोलिस परेड मैदानावर दोन्ही हेलीकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत तशीच उभी होती. तेथे जावून आमिर यांच्या यंत्रणेकडे चौकशी केली असता ते काहीच बोलत नव्हते. खासगी दौरा असून बाकी काही माहित नाही, असे त्यांनी सांगितले. उपस्थित पोलिस यंत्रणेकडे चौकशी केली असता त्यांनीही नेमके काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आमिर खान दाखल झाल्यानंतर अनेक चर्चांचे पेव फुटले आहे. 

संपादन - राहुल पाटील